लकी गुप्ता यांना तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार जाहीर
By श्रीकिशन काळे | Published: November 5, 2023 06:49 PM2023-11-05T18:49:12+5:302023-11-05T18:49:19+5:30
लकी गुप्ता यांनी सादर केलेल्या नाटकांची प्रयोगसंख्या काही हजारांच्या घरात आहे
पुणे : देशभरामध्ये नाटकाविषयी जनजागृती करणारे ‘थिएटर ऑन व्हील्स’ या संकल्पनेतून आठशेहून अधिक ठिकाणी एकल नाटके सादर करणारे लकी गुप्ता यांना यंदाचा तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ रंगकर्मी डाॅ. श्रीराम लागू यांनी स्थापन केलेले रूपवेध प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो.
पुरस्कार प्रदान सोहळा टिळक रस्त्यावरील ज्योत्स्ना भोळे सभागृह येथे १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे. या कार्यक्रमात संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ नाटककार राजीव नाईक यांच्या हस्ते लकी गुप्ता यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यानिमित्ताने महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि लागू कुटुंबीय यांच्या पुढाकाराने नव्याने उभारण्यात येत असलेल्या श्रीराम लागू रंगअवकाशाबद्दल आणि भारतीय रंगभूमीविषयी राजीव नाईक यांचे भाषण होणार आहे. लकी गुप्ता यांनी सादर केलेल्या नाटकांची प्रयोगसंख्या काही हजारांच्या घरात आहे. ‘माँ, मुझे टागोर बना दे’ या नाटकाचा १३०२ वा प्रयोग त्यांनी नुकताच भोपाळ येथे सादर केला.