तारादूत भरती प्रकल्प रखडला; २० ऑक्टोबरपासून ‘सारथी’समोर तारादुतांचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 09:33 PM2021-10-08T21:33:01+5:302021-10-08T21:33:07+5:30
विविध मराठा संघटना तसेच मराठा क्रांती मोर्चाचा आंदोलनाला पाठिंबा
पुणे: मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक तसेच शाश्वत विकासासाठी, सारथीच्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी तारादूत प्रकल्प हा महत्त्वाचा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १९ जून २०२१ रोजी झालेल्या बैठकीत तारादूत प्रकल्प तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र, चार महिने पूर्ण होत आले तरी तारादूत प्रकल्प हा सुरू झालेला नाही. येत्या २० ऑक्टोबरपासून (बुधवार) सारथीच्या कार्यालयासमोर २५ तारादूत, विविध मराठा संघटना तसेच मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे पुणे समन्वयक सचिन आडेकर यांनी दिली.
आडेकर म्हणाले, की १९ जून २०२१ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार, युवराज छत्रपती संभाजीराजे तसेच मराठा क्रांती मोर्चाचे सर्व समन्वयक आणि तारादूत प्रतिनिधी त्याचबरोबर सारथीच्या संचालक मंडळाबरोबर बैठक झाली होती. त्या बैठकीत अजित पवार यांनी तारादूत प्रकल्प सुरू करण्याचे आदेश सारथीच्या संचालक मंडळाला दिले होते. त्याबाबत त्वरित कार्यवाही सुरू करा, असेही सांगितले होते. मात्र, चार महिने हाेत आले तरी तारादूत प्रकल्पाबाबत अद्यापही काहीच हालचाली सुरू झाल्या नाहीत. सारथीच्या योजनेला वारंवार मुदतवाढ द्यावी लागत आहे. यासाठी तारादूत प्रकल्प हा महत्त्वाचा विषय आहे.
सारथीच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन
''तारादूत प्रकल्प तात्काळ सुरू करून सर्व प्रशिक्षीत तारादुतांना सारथी अंतर्गत अथवा बाह्य स्त्रोतामार्फत नियुक्त्या देण्यात याव्यात. याबाबत लवकर कार्यवाही करा. अन्यथा सर्व मराठा संघटनांना सोबत घेऊन तारादूत येत्या २० ऑक्टोबरपासून (बुधवार) सारथीच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचे ते म्हणाले आहेत.''