कोर्ट ऑफिसर होताय पक्षकारांचे टार्गेट :गेल्या ४० दिवसांत २ वकिलांवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 12:12 PM2018-12-27T12:12:08+5:302018-12-27T12:28:03+5:30
भांडण कोणत्याही प्रकारचे असो. त्यावर तुला न्यायालयात बघून घेतो असे सांगत अन्याय झालेली व्यक्ती दावा दाखल करते.
पुणे : भांडण कोणत्याही प्रकारचे असो. त्यावर तुला न्यायालयात बघून घेतो असे सांगत अन्याय झालेली व्यक्ती दावा दाखल करते. नागरिकांचा न्याय पालिकेवर असलेला विश्वास त्यातून स्पष्ट होतो. या प्रक्रियेत वकील महत्त्वाचा घटक आहे. मात्र, सध्या तुला बघुन घेतो हे वाक्य वकिलांनाच वापरले जात असून त्यातून त्यांच्यावर होणारे हल्ले देखील वाढले आहेत.
ऑफिसर ऑफ दी कोर्ट असणारे वकील न्यायालयात दाखल होणाऱ्या खटल्यांमध्ये कायद्याचा अभ्यास करून पक्षकारांची बाजू मांडतात. युक्तिवादादरम्यान विरुद्ध पक्षाचे मुद्दे खोडून काढतात आरोप-प्रत्यारोपाच्या
फैरी झडल्या जातात. सर्व प्रयत्न केल्यानंतरी काही अपेक्षित निकाल न लागल्याने तसेच विरुद्ध पक्षाच्या वकिलांने केलेल्या युक्तीवादामुळे रागावलेला पक्षकार थेट वकिलांनाच धमकी देत आहे. एवढेच नाही तर वकिलांवर जीवघेणा हल्ला केल्याच्या घटना देखील पुण्यात घडल्या आहेत. त्यामुळे वकील सुरक्षित आहेत का अशा प्रश्न उपस्थित झाला आहे. वकिलांवर वारंवार होणाऱ्या हल्यांमुळे वकील संरक्षण कायदा करण्यात यावा, अशी मागणी वकिलांकडून गेली अनेक वर्ष करण्यात येत होती. दरम्यान वकिलांची ही मागणी विचारात घेवून केंद्रीय कायदा विभागाने वकिलांसाठी संरक्षण कायद्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळापुढे मांडण्यात येणार आहे. हा कायदा मंजूर झाल्यास वकिलांवर हल्ला करणाऱ्यांना वचक बसण्याची शक्यता आहे.
२२ क्टोंबर रोजी रात्री संगमवाडी ब्रीजवरून जात असलेले अॅड. देवानंद ढोकणे (वय ४२, रा. येरवडा) यांच्यावर दोघांनी गोळीबार करत प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर २० डिसेंबर रोजी अॅड. संदीप फडके यांच्यावर एरंडवणे येथे हल्ला करण्यात आला. त्यात ते जखमी झाले आहेत. त्यापुर्वी कौटुंबिक न्यायालयात देखील कामकाज सुरू असताना पक्षकारांकडून वकिलांना मारहाण करण्यात आली होती.
................
वकिलांवर होणारे हल्ले न्यायपालिकेच्या दृष्टीने चांगले नाही. त्यामुळे त्यांना संरक्षण मिळालेच पाहिजे. तसेच हल्लेखोरांना शिक्षा देण्यासाठी कालबद्ध पद्धतीने खटला चालावा. खटला मार्गी लागण्यासाठी झालेल्या उशीरास आपले किंवा विरु द्ध पक्षाचे वकील जबाबदार आहेत, अशी समजूत झाली त्याचा उद्रेक हल्ल्यांच्या माध्यमातून होतो. या सर्व प्रकारांमुळे वकिलांनी देखील आत्मपरीक्षण करावे. खटले लवकर निकाली लागण्यासाठी प्रयत्न करावे. त्यातून हल्ले थांबण्याची शक्यता आहे.
- अॅड. एस. के. जैन, ज्येष्ठ विधिज्ञ.