निकालाला मोबाईलची साथ
By admin | Published: May 28, 2015 12:36 AM2015-05-28T00:36:39+5:302015-05-28T00:36:39+5:30
निकाल पाहण्यासाठी महाविद्यालयांत झुंबड... सायबर कॅफेमध्ये गर्दी.. असे दृश्य आता इतिहास जमा झाले असून, बुधवारी अनेक विद्यार्थी व पालकांनी घरबसल्या मोबाईलवर निकाल पाहिला.
पुणे : निकाल पाहण्यासाठी महाविद्यालयांत झुंबड... सायबर कॅफेमध्ये गर्दी.. असे दृश्य आता इतिहास जमा झाले असून, बुधवारी अनेक विद्यार्थी व पालकांनी घरबसल्या मोबाईलवर निकाल पाहिला. महाविद्यालयांत जाणाऱ्या बहुतेक विद्यार्थ्यांकडे; तसेच त्यांच्या पालकांकडे स्मार्ट फोन आणि त्यावर इंटरनेटची सुविधा असल्याने, निकाल पाहण्यासाठी घराबाहेर पडावे लागलेच नाही. तसेच परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांवर वॉट्स अपवरून अभिनंदनाचा वर्षाव झाला.
बारावीचा निकाल बुधवारी दुपारी १ वाजता आॅनलाइन जाहीर करण्यात आला. राज्य शिक्षण मंडळाने त्यासाठी काही संकेतस्थळ उपलब्ध करून दिली होती. तसेच, काही मोबाईल कंपन्यांनी एसएमएसद्वारे निकाल कळविण्याची सुविधा पुरविली होती. महाविद्यालयीन तरुणांमध्ये मोबाईलची क्रेझ वाढली आहे. त्यातही स्मार्ट फोन आणि त्यावर हमखास इंटरनेटची सुविधा असते. तसेच, अनेकांच्या घरीही इंटरनेटची सुविधा पोहोचली आहे. निकाल आॅनलाइन जाहीर होणार असल्याने अनेकांनी काही वेळ आधीच मोबाईल व घरच्या संगणकापुढे जाऊन बसले होते. घड्याळाचा काटा एकच्या जवळ येत होता, तसतसे उत्सुकता आणि भीतीही वाढत चालली होती. दुपारी एक वाजल्यानंतर विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरील निकाल खुला झाला. अचानक लाखो विद्यार्थ्यांनी निकालासाठी विविध संकेतस्थळांवर प्रयत्न सुरू केल्याने सुरुवातीला काही काळ संकेतस्थळात तांत्रिक दोष निर्माण झाला. त्यामुळे काही वेळ विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यात अडचणी आल्या.
काही वेळाने पुन्हा संकेतस्थळ सुरळीत सुरू झाल्यानंतर, मोबाईल तसेच घरातील संगणकावर निकाल पाहण्यासाठी झुंबड उडाली. निकाल हाती आल्यानंतर काहींच्या चेहऱ्यावर हास्य फुलले, तर काहींचा चेहरा निराशेने कोमेजून जात होता. काही विद्यार्थ्यांना यशापयशाची ‘परीक्षा’ पालकांसमोरच द्यावी लागली. निकाल लागल्यानंतर ठिकठिकाणी मित्र-मैत्रिणींनी एकत्रित येत सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. सुट्टीत बाहरेगावी किंवा सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांनी मोबाईलवरूनच एकमेकांना शुभेच्छा दिल्या. निकालाला मोबाईलची साथ मिळाल्याने महाविद्यालयांसह सायबर कॅफेही ओस पडले होते. महाविद्यालयांमध्ये निकालाचा जल्लोष झाला नाही. काही तुरळक सायबर कॅफेमध्ये विद्यार्थी दिसत होते. तसेच, शहराच्या विविध भागात काही काळासाठी वीज गायब झाल्याने विद्यार्थ्यांना मोबाईलचा आधार घ्यावा लागला. ज्यांच्या मोबाईलवर इंटरनेटची सुविधा नाही, त्यांनी मित्र-नातेवाइकांकडून आपला निकाल जाणून घेतला. (प्रतिनिधी)
पुण्यातील महाविद्यालयांची टक्केवारी
महाविद्यालयाचे नाव निकाल
रेणुकास्वरूप गर्ल्स प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय १००
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालय (मुलांची ) १००
बी.एच. चाटे कनिष्ठ महाविद्यालय ९९.८१
मुक्तांगण कनिष्ठ महाविद्यालय ९९.६५
विमलाबाई गरवारे कनिष्ठ महाविद्यालय ९९.५०
गरवारे महाविद्यालय, कॉमर्स ९९.१६
बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय ९८.९८
मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड ९८.६१
फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे ९८.३८
महिलाश्रम हायस्कूल व महाविद्यालय, कर्वे नगर ९७.५१
नूतन मराठी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय (मुलांची) ९७.४५
हुजूरपागा महाविद्यालय ९७.४२
नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालय ९७.१९
लक्ष्मणराव आपटे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ९६.७१
डॉ. श्यामराव कलमाडी कनिष्ठ महाविद्यालय ९५.४४
सेट मिराज महाविद्यालय ९५.३७
सिंबायोसिस महाविद्यालय ९४.८९
एम.आय.टी. महाविद्यालय ९४.११
नूतन मराठी प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय (मुलींची) ९२.९५
मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालय ९०.३१