काळा पैसा बिटकॉईनमध्ये रुपांतरीत करण्यासाठी व्यावसायिक ठरताहेत टार्गेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 04:37 PM2018-08-08T16:37:31+5:302018-08-08T16:41:13+5:30
व्यावसायिकांना हेरुन त्यांच्याकडील काळा पैसा बिटकॉईमध्ये रुपांतरीत करण्यासाठी टार्गेट केले जात आहे़. असे अनेक प्रकार पुणे शहरात व इतरत्र होत असून त्यात मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे़.
पुणे : व्यावसायिकांना हेरुन त्यांच्याकडील काळा पैसा बिटकॉईमध्ये रुपांतरीत करण्यासाठी टार्गेट केले जात आहे़. असे अनेक प्रकार पुणे शहरात व इतरत्र होत असून त्यात मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे़. मात्र, हा सर्व पैसा बेहिशोबी असल्याने कोणीही तक्रार देण्यासाठी पुढे येत नसल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते मनोज ओसवाल यांनी पत्रकार परिषदेत केला आहे़.
याबाबत ओसवाल यांनी सांगितले की, पुण्यातील एका आघाडीच्या व्यावसायिकाने आपल्याला बिटकॉईनच्या खरेदी व त्याची सत्यता पडताळणीसाठी बोलावले होते़. त्यांना एका विमान प्रवासात दिल्लीतील एक व्यक्ती भेटली व तिने त्यांना त्यांचा पैसा क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची पद्धत समजावून सांगितली होती़. ही व्यक्ती मोठ्या मोठ्या कंपनीचे संचालक व व्यावसायिक यांना हेरुन आपल्याकडे बिटकॉईन असल्याची सांगतो़. त्यानंतर त्यांच्याकडील काळा पैसा यात रुपांतरीत करुन सुरक्षित ठेवता येईल़. त्यासाठी काही कमिशन द्यावे लागेल, असे सांगत असे़ पुण्यातील या व्यवसायिकालाही त्याने आपल्या खात्यात १ हजार कोटी रुपये असल्याचे दाखविले होते़. त्यांना ४० कोटी रुपये गुंतवणूक करुन देण्याचे आश्वासन दिले होते़. त्यानुसार त्यांनी पैसे ट्रान्सफरही केले होते़. पण, हा व्यवहार पूर्ण न झाल्याने त्यांचे पैसे वाचले आहेत़. परंतु, अशा प्रकारे अनेकांची छोट्या मोठ्या रक्कमेची फसवणूक झाली आहे़. परंतु, हा सर्व पैसा बेकायदेशीर असल्याने कोणीही तक्रार देण्यास पुढे येत नसल्याचा दावा मनोज ओसवाल यांनी केला आहे़. लोकांनी अशा प्रकारच्या कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये, असे त्यांनी सांगितले़.
---