Pune: टास्क, रिव्ह्यू, लाइकचा फंडा; सहा जणांना ७२ लाखांचा गंडा
By भाग्यश्री गिलडा | Published: February 2, 2024 06:29 PM2024-02-02T18:29:48+5:302024-02-02T18:30:16+5:30
या घटनांनी नागरिक अधिक सतर्क राहण्याची गरज अधाेरेखित झाली आहे....
पुणे : पार्टटाइम जॉबचे आमिष दाखवून शहरातील सहा वेगवेगळ्या लोकांची फसवणूक केली. याप्रकरणी गुरुवारी (दि. १) संबंधित पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. या घटनांनी नागरिक अधिक सतर्क राहण्याची गरज अधाेरेखित झाली आहे.
नेमकं घडलं कसं?
घटना क्र. १ :
बाणेर परिसरात राहणाऱ्या अभय भास्कर आमलेकर (४४) यांना टेलिग्रामच्या माध्यमातून संपर्क साधून टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. सुरुवातीला नफा देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर आमलेकर यांना २७ लाख ५१ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
घटना क्र. २ :
वाघोली येथे राहणाऱ्या उमेश मधुकर कल्याणकर (४०) यांना हॉटेल रिव्ह्यू, लाइक करून शेर केल्यास भरघोस नफा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यांना एकूण १८ लाख ४२ हजार रुपये भरण्यास भाग पाडून फसवणूक केली. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
घटना क्र. ३ :
कोथरूड परिसरात राहणाऱ्या मिहीर गोविंद ढेरे (३२) यांना टास्क पूर्ण केल्यास चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून प्रीपेड टास्कच्या नावाखाली १० लाख ५४ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
घटना क्र. ४ :
आंबेगाव पठार परिसरात राहणाऱ्या २९ वर्षीय तरुणीला अज्ञात मोबाईल क्रमांकावरून फोन आला. पार्टटाइम जॉब म्हणून वेळोवेळी टास्क पूर्ण करण्यास सांगून एकूण ८ लाख १० हजार रुपये भरण्यास भाग पाडले. मात्र, कोणताही परतावा दिला नाही. अखेर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
घटना क्र. ५ :
मुंढवा परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेला जास्त परताव्याचे आमिष दाखवून वेगवेगळी कारणे सांगत एकूण ४ लाख ६६ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. पैसे भरूनही नफा दिला नाही, म्हणून मुंढवा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
घटना क्र. ६ :
कॅम्प परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेला पार्टटाइम जॉबसाठी टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड केले. सुरुवातीला मोबदला देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर २ लाख ८१ हजार रुपये भरायला सांगून महिलेची फसवणूक केली आहे. लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.