लोणच्याची चवही महाग; आंबा १०० रुपयांवर!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 01:05 PM2022-07-04T13:05:42+5:302022-07-04T13:06:54+5:30
यंदा लोणच्याची चवही महागली...
पुणे : जेवण अधिक रुचकर व्हावे यासाठी बहुतांश वेळा ताटात लोणचे असतेच. हेच लाेणचे घरच्या घरी बनविण्यासाठी कच्च्या कैऱ्यांची खरेदी जोरात सुरू आहे; पण कैऱ्यांचे दर गगनाला भिडले, ते फाेडून घेणे, त्यासाठी लागणारा मसालाही महागल्याने यंदा लोणच्याची चवही महागली आहे.
आवक कमी झाल्याने लोणच्याचा व्यवसाय करणारे व्यापारी शेतकऱ्यांचा माल थेट जागेवर जाऊन खरेदी करतात. त्यामुळे बाजारात कैरीचे आंबे मिळणे अवघड झाले आहे. कैरीचे दर सध्या ६० ते ७० रुपये किलो आहे. तसेच कैरी फोडण्यासाठी एक किलोसाठी १५ ते २० रुपये वेगळे माेजावे लागत आहेत. मसालाही महागल्याने सामान्य नागरिकांना ते परवडणारे नाही.
जेवण रुचकर लागावे आणि जीभेवर चव लागण्यासाठी लोणचे लागते, मात्र कैरीचे दर वाढले असून, कैरी फोडण्यासाठी एक किलोकरिता १५ ते २० रुपये वेगळे माेजावे लागत आहेत. त्यात मसालाही महाग झाल्याने लोणचे घरी बनवण्यापेक्षा विकत घेतलेलेच बरे असे वाटत आहे.
- प्रियांका शहाणे, गृहिणी
वाढत्या महागाईमुळे सामान्यांना घरगुती लोणचे बनवणेदेखील परवडत नाही. विकतचे लोणचे घेतलेले बरे असे वाटत आहे.
- सुरेखा दहिवाळ, गृहिणी, धनकवडी
कैरीच्या आंब्याची मागणी वाढत असली तरी आवक कमी झाल्याने बाजारात पूर्वीसारखे आंबे येत नाहीत. मोठे व्यापारी शेतकऱ्यांकडून जागेवर खरेदी करतात. त्यामुळे सामान्य नागरिक विकतचे लोणचे घेण्यावर भर देत आहेत.
- अमोल घुले, आंब्याचे व्यापारी