ब्रेड पॅटिस - गारव्यातील गरम खाबूगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 02:33 PM2022-12-17T14:33:58+5:302022-12-17T14:35:01+5:30

जाणून घ्या पुण्यातील ठिकाणे....

tasty katta in pune Bread Patties – Hot sweets in gravy | ब्रेड पॅटिस - गारव्यातील गरम खाबूगिरी

ब्रेड पॅटिस - गारव्यातील गरम खाबूगिरी

googlenewsNext

- राजू इनामदार

पुणे : ब्रेड, बटाटा हे पदार्थच असे आहेत की, त्यांच्या वाट्याला बदनामी आहे, मात्र तरीही मागणी भरपूर आहे. याचे कारण त्यांच्या वेगळेपणात असावे. सोलायची वगैरे फार कटकट नाही, बटाटे तरी उकडावे लागतात. ब्रेड तर काहीही लावून खाता येतो. हे पदार्थ एकत्र आणून, त्यात मीठ-मिरचीमसाला टाकला व डाळीच्या पिठात बुडवून तळले की तयार होतात ब्रेड पॅटिस. थंडीचा गारवा वाढला की पॅटिस खावेत, असे खाबूगिरी करणाऱ्यांचे पोटातून आलेले मत आहे.

या गोष्टी हव्यात...

ब्रेड ताजा हवा. शिळा ब्रेड घेतला की त्याचे तुकडे पडतात. बटाटे उकडून चांगले कुस्करून घ्यायचे. त्यानंतर मग बटाट्याची भाजी करताना जे काही करतो, ते करून भाजीच करायची. म्हणजे आधी कडीपत्ता, मोहरी वगैरेची फोडणी, मग आले-लसणाची थोडी हिरवी मिरची घालून केलेली पेस्ट, त्यावर उकडलेल्या बटाट्याचा कुस्करा व वरून भरपूर कोथिंबीर, हा मसाला यातील सर्वात महत्त्वाचा. तो चवदार झाला की पॅटिस चवदारच होणार.
पूर्वतयारी

अशी भाजी तयार झाली की, डाळीचे पीठ. त्यात पाणी घालून थोडे पातळ करायचे. फार पातळ केले की मग ते ब्रेडवर टिकत नाही. त्यामुळे पाणी घालताना काळजी घ्यावी लागते. पिठातील सर्व गठुळ्या काढून ते चांगले एकजीव करायचे. मग ब्रेड. त्याचा एक स्लाईस समोर ठेवायचा व त्यावर तयार झालेली भाजी ठेवायची. ती चांगली पसरून घ्यायची. त्यावर ब्रेडचा दुसरा स्लाईस ठेवायचा. दोन्ही स्लाईस एकमेकांपासून वेगळे होणार नाहीत, इतपत त्यावर दाब द्यायचा.
असे करतात पॅटिस

ब्रेडचा एकएक चौकोन समोर ठेवून सुरीने बरोबर मधून, पण तिरका कापायचा. म्हणजे त्याचे दोन त्रिकोण होतील. कढईतील तेल तापले की मग हे त्रिकोण डाळीच्या पिठात बुडवून अगदी हलक्या हाताने तेलात सोडायचे. चांगले सोनेरी होईपर्यंत दोन्ही बाजूंनी तळायचे. काही ठिकाणी हे पिवळे असतानाच काढतात, पण ते कच्चे लागतात. फार वेळ ठेवले की जळतात. त्यामुळे सोनेरी रंग आला की बाहेर काढून घ्यायचे.
थोडी सजावट

आता यावर थोडे चिंचेचे पाणी, कोथिंबीर, सॉस, असे टाकले की चांगली शोभिवंत दिसतात व खायलाही मजा येतो. फारच तेल पितात, तेलकट लागतात, पोटात तेल फार जाते, इतके डाळीचे पीठ, तेही ब्रेड व बटाट्याबरोबर अशी टीका पॅटिसच्या वाट्याला नेहमीच येते. मात्र तरीही ते प्रचंड खपतात. ठिकठिकाणी चालतात. काहींनी त्यात स्वत:चे असे वेगळे तंत्र तयार केले आहे. त्यामुळे तेल कमी लागते, मात्र चवीत फरक पडतो.

कुठे खाल- डांगी पॅटिस- गोखलेनगर, सोनल पॅटिस- कस्तुरे चौक, बाबा पॅटिस- सहकारनगर, शिंदे हायस्कूलसमोर
कधी- शक्यतो सकाळी किंवा मग दुपारी ४ नंतर.

Web Title: tasty katta in pune Bread Patties – Hot sweets in gravy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.