टाकवे बुद्रकमध्ये होणार ग्रामअभ्यासिका

By admin | Published: January 11, 2017 02:50 AM2017-01-11T02:50:09+5:302017-01-11T02:50:09+5:30

जिल्हा परिषदेने आपल्या शेवटच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण

Tavve will be a gramcoaster in Budrak | टाकवे बुद्रकमध्ये होणार ग्रामअभ्यासिका

टाकवे बुद्रकमध्ये होणार ग्रामअभ्यासिका

Next

पुणे : जिल्हा परिषदेने आपल्या शेवटच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रत्येक तालुक्यात एक अत्याधुनिक अशी ग्रामअभ्यासिका करण्यात येणार आहे. याला मंजुरी मिळाली असून यात प्राधान्याने स्पर्धा परीक्षच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रकचा त्यात समावेश आहे.
खेडोपाड्यातील मुलं शिकली, मोठी झाली तर हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली असू शकते, म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून समाजमंदिरात प्रत्येक जिल्हा परिषद गटात एक अभ्यासिका करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती. मात्र, यात महत्त्वपूर्ण बदल करून आता प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे १३ ग्राम अभ्यासिका इमारतीसह अत्याधुनिक स्वरूपात करण्याचे ठरविले आहे. तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायती व शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाची केंद्र असलली गावे यासाठी निवडण्यात आली आहेत. एका अभ्यासिकेसाठी ३३ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असून यात सुसज्ज इमारत, ग्रंथालय, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी चांगली बैैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. १०० विद्यार्थ्यांची एका वेळेस व्यवस्था करण्यात येणार आहे. अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेला उपयुक्त असलेली सर्व पुस्तके ठेवण्यात येणार आहेत. तसेच इतर साहित्याची पुस्तकेही ठेवण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मूलमंत्र दिला. हा मूलमंत्र डोळ्यांसमोर ठेवून जिल्हा परिषद प्रशासनाने शाहू, फुले व आंबेडकर यांच्या नावाने अभ्यासिका करण्याचा निर्णय घेतल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

थोर पुरुषांचे स्मरण फक्त जयंतीनिमित्तच न करता त्यांच्या विचारांची व कार्याची प्रेरणा कायम स्मरणात राहावी, सातत्याने त्यांचे विचार समाजात रुजावेत, यासाठी या अभ्यासिका काम करीत आहोत.
- प्रदीप कंद, अध्यक्ष, जिल्हा परिषद

Web Title: Tavve will be a gramcoaster in Budrak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.