समान करप्रणालीमुळे करचुकव्यांना चाप
By admin | Published: April 27, 2017 04:52 AM2017-04-27T04:52:20+5:302017-04-27T04:52:20+5:30
जीएसटी अर्थातच वस्तू आणि सेवा कर हा संपूर्ण देशभरात लागू केला जाणार असून, व्हॅटसह इतर सर्व कर रद्द होणार आहे.
बारामती : जीएसटी अर्थातच वस्तू आणि सेवा कर हा संपूर्ण देशभरात लागू केला जाणार असून, व्हॅटसह इतर सर्व कर रद्द होणार आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या करप्रणालींना पर्याय म्हणून जीएसटीकडे पाहिलं जात आहे. समान करप्रणालीमुळे करचुकव्यांना चाप बसणार आहे, अशी माहिती विक्रीकर सहआयुक्त आर. आर. पाटील यांनी दिली.
बारामती व्यापारी महासंघाने आयोजिलेल्या वस्तू व सेवा कर चर्चासत्रामध्ये पाटील बोलत होते. पाटील म्हणाले, ‘‘या करप्रणालीमुळे देशभरातील कोणत्याही राज्यामध्ये समान वस्तूंवर समान करप्रणाली राहणार आहे. त्यामुळे यापूर्वी होत असलेल्या करचुकवेगिरीला आळा बसणार आहे. यापूर्वी असणाऱ्या १७ प्रकारच्या करप्रणाली रद्द करून शासनाने आता केवळ जीएसटी ही एकच करप्रणाली लागू केली आहे. या वेळी विक्रीकर उपायुक्त संजाली डायस यांनी उपस्थित बँक सल्लागार, चार्टर्ड अकौंटंट, व्यापारी यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली, तर अनेक शंकांचे निराकरण केले.
चर्चासत्राला बारामती शहर व परिसरातील व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या वेळी जवाहर वाघोलीकर, शांतीशेठ सराफ, नरेंद्र गुजराथी, संजय संघवी, नाना सातव, आनंद छाजेड, अशोक तांबे, धनंजय जामदार आदी उपस्थित होते. स्वप्निल मुथा यांनी सूत्रसंचालन केले.