ढगाळ हवामानामुळे कांद्यावर करपा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:16 AM2021-03-04T04:16:51+5:302021-03-04T04:16:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आळेफाटा: जुन्नर तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण तयार होत असल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
आळेफाटा: जुन्नर तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण तयार होत असल्याने कांदा पिकाला याचा फटका बसत आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे कांद्यावर रोग व किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. शेतकऱ्यांना या हवामानामुळे फवारणीच्या खर्चात वाढ होताना दिसून येत आहे.
डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झालेली आहे. यावर्षी कांदा बियाण्यांचा तुटवडा असल्याने कांदा लागवडीचा भांडवली खर्च मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यातच पाऊसही मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याचाही कांदा पिकाला फटका बसला होता. मध्यंतरी काही ठिकाणी गारपीट झाल्यानेही कांद्याचे नुकसान झाले. यामुळे या वर्षी कांद्याच्या भांडवली खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यातच कांद्याचे बाजार भाव चांगले असल्याने शेतकऱ्यांना या पिकातून चार पैसे मिळतील अशी अपेक्षा असताना कांद्याचे बाजार भाव कमी होत असल्याचे दिसून येत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत अजून वाढ झाली आहे.
चौकट
ढगाळ हवामानामुळे कांद्यावर अळी, मावा, तुडतुडे या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येत आहे. त्यातच इंधनाचे भाव वाढल्याने मशागतीचा खर्चही वाढलेला आहे. शासनाने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान जाहीर केले होते. मात्र, तेही अद्याप मिळालेले नाही. शेतकऱ्यांना कोरोना महामारीमुळे कोणत्याच नगदी पिकांना बाजारभाव मिळाला नाही. त्यामुळे बँकांची शेतीकर्जे माफ करावीत किंवा शासनाने आदेश काढून मार्चअखेर शेती कर्जाचा भरणा करण्याची सक्ती करू नये त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट कळण्यास मदत होईल.
कोट
ढगाळ हवामानामुळे कांद्यावर मावा, तुडतुडे व किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. औषध फवारणी मुळे भांडवली खर्चात वाढ झाली आहे. इंधनाचे दर वाढल्याने मशागतीचा खर्च वाढला आहे. त्यातच कोरोनामुळे शेती पिकांना बाजारभाव मिळाले नसल्याने शेतकऱ्यांची पीककर्ज माफ करावीत किंवा मार्चअखेर भरावयाच्या पीककर्जास शासनाने स्थगिती द्यावी
- पोपट बढे, कांदा उत्पादक शेतकरी
गेल्या आठ दिवसांपासून जुन्नर तालुक्यात ढगाळ हवामान तयार होत आहे. यामुळे कांद्यावर मावा, तुडतुडे, लाल कोळीचा प्रादुर्भाव जास्त वाढल्याने शेतकऱ्यांनी ताबडतोब औषध फवारणी करणे गरजेचे आहे. बुरशीनाशक व कीटकनाशकाची फवारणी केल्यास होणारे कांदा पिकाचे संभाव्य नुकसान टाळता येईल.
- नीलकंठ भोर, कृषी सल्लागार,भोरवाडी, वडगाव कांदळी