पुणे महापालिकेच्या तिजोरीत वर्षाअखेर तेराशे कोटींचा कर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 10:30 PM2020-01-01T22:30:00+5:302020-01-01T22:30:02+5:30
वसुलीसाठी तीन हजारांहून बिगरनिवासी मिळकतींसमोर वाजविला बॅण्ड
पुणे : पुणे महापालिकेच्या कर संकलन विभागाने ३१ डिसेंबर,२०१९ अखेर १ हजार २९९ कोटी २८ लाख रूपये पालिका तिजोरीत जमा केले आहेत. थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी कर संकलन विभागाकडून राबविणाºया अभियानात, बॅण्ड वाजवून संबंधिताचा थकीत कराचा डंका पिटला जात आहे. परिणामी मिळकत धारकाकडून थकित मालमत्ता कराची वसुली करण्यास पालिकेला यश आले आहे.
पुणे महापालिकेचे कर संकलन प्रमुख विलास कानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर,२०१९ पासून थकित मालमत्ता कर वसुलीसाठी बहुतांशी कर थकित बिगर निवासी मिळकतींसमोर बॅण्ड वाजवून, संबंधितांना थकीत कराची जाणीव करून दिली जात आहे. वारंवार नोटिस पाठवून कर जमा न झाल्याने बॅण्ड वाजून संबंधिताला जागे करण्यात येत आहे. आपल्या थकीत कराचा आणखी गाजा-वाजा नको म्हणून मिळकतधारक थकीत कर पालिकेकडे जमा करीत आहे. पालिकेने गेल्या दोन महिन्यात शहरातील तीन हजाराहून अधिक बिगर निवासी मिळकतींसमोर थकीत कर वसुलीसाठी हा अभिनव प्रयोग राबविला आहे.
पालिकेच्या वार्षिक करवसुलीचा हिशोब आर्थिक वर्षानुसार ठेवला जातो. गेल्या आर्थिक वर्षात पालिकेला मालमत्ता करातून १ हजार १९५ कोटी रूपये मिळाले होते. याची तुलना करता यावर्षी ३१ डिसेंबर,२०१९ अखेर म्हणजेच नऊ महिन्यात पालिकेच्या तिजोरीत १ हजार १०० कोटींचा मालमत्ता कर जमा झाला आहे़. गेल्यावर्षीपेक्षा तो १२५ कोटी रूपयांनी जास्त आहे़.
कर संकलन विभागाने शहरातील ७ लाख ५१ हजार ३५६ मिळकतींकडून १ जानेवारी,२०१९ ते ३१ डिसेंबर,२०१९ या कॅलेंडर वर्षात १ हजार २९९ कोटी २८ लाख ४१ हजार ९३० कोटी रूपये जमा केले आहे. ऑनलाईन पेमेंट धरून हा आकडा तेराशे कोटींवर गेला आहे़. या करप्राप्तीमध्ये शहरातील ६ लाख ५१ हजार ३५६ निवासी मालमत्तांकडून ६३६ कोटी ८६ लाख,९७ हजार रूपये, १ लाख ३ हजार ६ बिगर निवासी मालमत्तांकडून ५१० कोटी ६९ लाख ९४ हजार ४३ रूपये, ११ हजार ३६३ ओपन प्लॉटव्दारे ६१ कोटी ८८ लाख ७९ हजार ८८६ रूपये तर इतर १४ हजार ४३५ मिळकतींद्वारे ८९ कोटी ८२ लाख ७० हजार ६४५ रूपये मालमत्ता कर जमा झाला आहे.
.........
थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी ३१ डिसेंबर,२०१९ अखेर न्यायालयामार्फ त शहरातील १८७ मिळकतधारकांना नोटिस बजाविण्यात आल्या असून, याद्वारे जमा झालेल्या धनादेशाव्दारे १ कोटी २ लाख रूपये पालिकेला मिळाले आहेत. तर ज्या मिळकत धारकांचे धनादेश वटले नाहीत अशा २२ मिळकत धारकांवर न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत.