करवाढ म्हणजे पुणेकरांचा विश्वासघात

By admin | Published: March 31, 2017 03:02 AM2017-03-31T03:02:36+5:302017-03-31T03:02:36+5:30

महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मिळकत कर व पाणीपट्टीमध्ये प्रस्तावित केलेल्या करवाढीला पदाधिकाऱ्यांनी विरोध

Taxation is the betrayal of Puneites | करवाढ म्हणजे पुणेकरांचा विश्वासघात

करवाढ म्हणजे पुणेकरांचा विश्वासघात

Next

पुणे : महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मिळकत कर व पाणीपट्टीमध्ये प्रस्तावित केलेल्या करवाढीला पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी हा पुणेकरांचा विश्वासघात असल्याचे म्हटले तर काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी प्रशासन पुणेकरांची फसवणूक करत असल्याची टीका केली आहे. सत्ताधारी भाजपाबरोबर आघाडी असलेल्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनीही आयुक्तांवर टीका केली आहे.
तुपे म्हणाले, २४ तास पाणी योजनेला मंजूरी दिली गेली, त्यावेळी पहिल्या वर्षी म्हणजे सन २०१६-१७ मध्ये १२ टक्के व नंतर पुढची सलग ३० वर्षे ५ टक्के अशी पाणीपट्टी वाढ होती. त्यालाच मंजूरी मिळाली होती. असे असताना आयुक्तांनी यावर्षी सन २०१७-१८ साठी एकदम १५ टक्के वाढ सुचवली आहे. मिळकत करात वाढ करण्याचा विषयच नव्हता तरीही एकदम १२ टक्के वाढ केली आहे. हा पुणेकरांचा विश्वासघात आहे. सत्ताधारी भाजपाने सत्तेच्या सुरूवातीच्या काळातच तो सुरू केला आहे. आम्ही या करवाढीला विरोध करणार आहोत.
अरविंद शिंदे म्हणाले, योजना मंजूर झाली होती त्यावेळी काँग्रेस, शिवसेना व मनसे या तिन्ही पक्षांनी पाणीपट्टी वाढीला विरोध केला होता. मतदारांनी महापालिकेत त्यांना नाकारले याचा अर्थ काय घ्यायचा? ही करवाढ अन्यायकारक आहे, असेच आमचे आजही म्हणणे आहे. पाणीपट्टीत १५ टक्के करवाढ कशाच्या अनुषंगाने केली याचा खुलासा आयुक्तांनी करावा.
आम्ही त्यांना तो मागणारच आहोत. पक्षीय स्तरावर या करवाढीवर चर्चा करून आम्ही निर्णय घेऊच, पण आयुक्त एकीकडे आॅनलाइन कर जमा करणाऱ्यांना सवलत देतात, थकबाकीदारांसाठी अभय योजना जाहीर करतात व दुसरीकडे सर्वसामान्य पुणेकरांवर मात्र करवाढीचा बोजा लादतात, हे चुकीचे आहे.
(प्रतिनिधी)

शहरातील ४२ टक्के लोकसंख्या स्लममध्ये आहे. पाणीपट्टीवाढीचा त्यांना त्रास होणार आहे. त्याचा विचारही न करता आयुक्तांनी मिळकत करातही वाढ केली आहे. ही फसवणूक आहे. पाणीपट्टीवाढीचे जे सूत्र ठरले होते त्याला आयुक्तांनी हरताळ फासला
आहे. अत्यंत अयोग्य व अनावश्यक अशी ही करवाढ आहे. त्यांनी मिळकत कराचे मागील वर्षीचे उद्दिष्ट साध्य करता आलेले नाही व ही घट ते करवाढ करून भरून काढत आहेत, हे आम्ही मान्य करणार नाही.
- डॉ. सिद्धार्थ धेंडे

Web Title: Taxation is the betrayal of Puneites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.