कर २ कोटी, थकीत व्याज ४ कोटी, महापालिकेला भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 02:44 AM2018-10-04T02:44:33+5:302018-10-04T02:45:00+5:30
दंडाची रक्कम २ कोटी : जाहिरात विभागाकडून महापालिकेला भुर्दंड
पुणे : जाहिरातदारांकडून सेवाकरापोटी रक्कम वसूल केली नसल्याचा चांगलाच फटका महापालिकेला बसला आहे. सेवा कराची रक्कम २ कोटी ८ लाख, ती जमा केली नाही म्हणून त्यावर व्याज ३ कोटी ८० लाख व तेही जमा केले नाही, म्हणून वर दंड म्हणून २ कोटी ८ लाख असा भुर्दंड महापालिकेला पडला आहे.
ज्या अधिकाऱ्यामुळे महापालिकेला हा मोठा आर्थिक फटका बसला त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाने महापालिका आयुक्तांकडे केली आहे. महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने जाहिरातफलकांपोटी १ एप्रिल २००६ ते ३१ मार्च २०११ अखेरपर्यंतचा सेवा करच जाहिरातदारांकडून वसूल केला नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या सेवा कर विभागाने महापालिकेला २ कोटी ८ लाख रुपये कोटी सेवा कर जमा करण्याची नोटीस दिली. सन २०१५ मध्ये महापालिकेने कर सल्लागारामार्फत याविरोधात अपील केले. त्याचा निकाल महापालिकेच्या विरोधात गेला.
या अपिलास विलंब झाल्याने ते मान्य होणार नाही, असे कर सल्लागाराने महापालिकेने कळवले आहे. त्यामुळे दंड जमा करावा लागणार हे निश्चित आहे. एका अधिकाºयाच्या चुकीमुळे महापालिकेला हा मोठा आर्थिक भुर्दंड बसला आहे. त्यामुळे मुळातच हा कर वसूल का केला गेला नाही, अपिलाचा निकाल विरोधात लागल्यानंतरही पैसे जमा का केले नाही, हे प्रश्न निर्माण होतात. त्याची चौकशी करावी व दोषी अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी मंचाचे पदाधिकारी विवेक वेलणकर व विश्वास सहस्रबुद्धे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
विरोधात अपील आलेच नाही
पुढे ३ वर्षे या निकालाच्याविरोधात अपीलच करण्यात आले नाही. त्यामुळे सेवा कर विभागाने मनपाला नोटीस पाठवून मूळ २ कोटी ८ लाख रुपयांवर ३ कोटी ८० लाख रुपये व्याज व २ कोटी ८ लाख रुपये दंड भरण्यास सांगितले. त्यामुळे गडबडलेल्या महापालिकेने मूळ रक्कम २ कोटी ८ लाख रुपये व ३ कोटी ८० लाख रुपये व्याज २५ सप्टेंबर २०१८ रोजी जमा करून टाकले. तसे सेवा कर विभागाला कळवले व २ कोटी ८ लाख रुपयांच्या दंडाबाबत अपील करणार असल्याचेही नमूद केले.