क्रिकेट सामन्यातून ६५ लाखांचा कर
By admin | Published: January 14, 2017 03:44 AM2017-01-14T03:44:21+5:302017-01-14T03:44:21+5:30
पुण्यातील गहुंजे येथे येत्या रविवारी (दि. १५) होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड या वन-डे क्रिकेट मॅचसाठी महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाने जिल्हा
पुणे : पुण्यातील गहुंजे येथे येत्या रविवारी (दि. १५) होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड या वन-डे क्रिकेट मॅचसाठी महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाने जिल्हा करमणूूक कर विभागाकडे तब्बल ६५ लाख रुपयांचा कर जमा केला आहे. शंभर टक्के तिकिटांची विक्री झाल्याने ही रक्कम करापोटी जमा होणार असल्याची माहिती जिल्हा करमणूक कर अधिकारी सुषमा पाटील-चौधरी यांनी दिली.
पुण्यात रविवारी होणारा भारत विरुद्ध इंग्लंड हा दुसरा आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामना आहे. दिवस-रात्र होणाऱ्या या सामन्यासाठी १५ डिसेंबर पासूनच तिकीट विक्री सुरु करण्यात आली होती. आॅनलाईन व काही ठराविक ठिकाणी प्रत्येक्ष तिकीट विक्री करण्यात आली. या वेळी तिकिटाचे दर वेस्ट स्टँड आणि इस्ट स्टँडसाठी ८०० रुपये तर साऊथ अप्पर साठी ११०० रुपये, साऊथ लोअरसाठी २ हजार रुपये, १७५० रुपये साऊथ इस्टसाठी, नॉर्थ वेस्ट व इस्टसाठी २ हजार रुपये, साऊथ पॅव्हेलियन ए आणि बी साठी तब्बल ३५०० रुपये तिकीट दर आकारण्यात आले आहे. याशिवाय कॉपोर्रेट बॉक्समध्ये १२ जणांसाठी आसन क्षमता असून, एका बॉक्ससाठी तब्बल सहा लाख रुपये शुल्क आकारले आहे. या सर्वांचा हिशेब करून एकूण तिकीट विक्री व त्यावर १५ टक्के कर आकारण्यात येत आहे. या मैदानाची क्षमता सुमारे ३७ हजार ४०६ एवढी असून, शंभर टक्के तिकीट विक्री झाल्याने ६५ लाख रुपयांचा कर मिळाला असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)