दागिने उत्पादक सराफांनाच कर लागू
By admin | Published: March 16, 2016 08:39 AM2016-03-16T08:39:19+5:302016-03-16T08:39:19+5:30
यंदाच्या अर्थसंकल्पात दागिन्यांवर केंद्रीय उत्पादन शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण, हा कर सरसकट सर्व सराफांना नाही. सोन्याच्या दागिन्यांचे उत्पादन करणाऱ्या
पुणे : यंदाच्या अर्थसंकल्पात दागिन्यांवर केंद्रीय उत्पादन शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण, हा कर सरसकट सर्व सराफांना नाही. सोन्याच्या दागिन्यांचे उत्पादन करणाऱ्या सराफांनाच हा कर भरावा लागणार आहे. छोटे सराफी व कारागिरांना हा कर भरावा लागणार नाही. सराफांनी गैरसमजुतीतून हा संप पुकारला आहे, असे स्पष्टीकरण केंद्रीय उत्पादन शुल्क, सेवा कर व सीमा शुल्क विभागाचे मुख्य आयुक्त भिखू राम यांनी पत्रकार परिषदेत दिले.
या वेळी केंद्रीय उत्पादन शुल्क, सेवा कर व सीमा शुल्क विभागाचे प्रमुख आयुक्त गौतम भट्टाचार्य, विभागीय आयुक्त आशिष वर्मा, राजेश पांडे, नरेंद्र कुलकर्णी उपस्थित होते. राम म्हणाले, की सराफांमध्ये या प्रस्तावित कराविषयी पूर्ण माहिती नसल्याचे दिसते. त्यामुळेच त्यांनी हा बंद पुकारला. सरसकट सर्व सराफांना हा कर नाही. जे सोन्याच्या दागिन्यांचे उत्पादन करतात म्हणजे ते सोन्याचे दागिने घडवितात, ज्यांची वार्षिक उलाढाल ६ कोटींच्या पुढे आहे, त्यांनाच हा कर भरावा लागणार आहे. जे कारागिर सोन्याचे दागिने घडवितात त्यांना आणि ज्या सराफांची वार्षिक उलाढाल ६ कोटींपेक्षा कमी आहे त्यांना हा कर भरावा लागणार नाही. विशेष म्हणजे, इतर क्षेत्रातील उद्योजकांचे वार्षिक उत्पन्न दीड कोटी रूपयांच्या पुढे असले की त्यांना हा कर भरावा लागतो. मात्र सराफांसाठी ही मर्यादा दीड कोटी रूपयांवरून सहा कोटी रूपये करण्यात आली आहे.
सध्याच्या कराबाबत सराफांना पूर्ण माहिती नसल्याने त्यांनी बंद पुकारला आहे, असे सांगत भट्टाचार्य म्हणाले, परदेशांमधून आयात करण्यात येणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांवर अगोदरपासूनच केंद्रीय उत्पादन शुल्क आकारण्यात येते. देशात उत्पादन होणाऱ्या प्रत्येक वस्तूवर हा कर लावला जातो. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून देशात उत्पादीत होणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांवर हा कर लावला जात नव्हता. तो यंदा लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा कर भरण्यासाठी दोन पध्दती तयार करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये इनपुट क्रेडिट न वापरता केवळ एकच टक्के उत्पादन शुल्क भरायचे
किंवा ज्यांना इनपुट क्रेडिट वापरायचे आहे त्यांनी १२.५ टक्के उत्पादन
शुल्क भरायचे.
कर आॅनलाईन भरावा लागणार
केंद्र सरकारकडून सोन्याच्या दागिन्यांवर लावण्यात आलेला केंद्रीय उत्पादन शुल्क हा कर जरी सुरूवातीला सराफांना भरावा लागणार असला, तरी तो त्यांनी ग्राहकांकडून वसूल करायचा आहे.
कारण हा कर सेवा शुल्कात मोडणारा आहे.
त्यामुळे खरेदी करण्यात येणारी संबंधित वस्तू जो व्यक्ती वापरणार आहे, त्यानेच कर भरायचा आहे. त्यामुळे सराफांवर आर्थिक बोजा पडणार नाही, असे स्पष्टीकरण भिखू राम यांनी दिले.
कराचा भार ग्राहकांवर
मोठ्या सराफांना द्यावा लागणारा हा कर आॅनलाईन भरायचा आहे. त्यांची नोंदणी, कर भरणा, विवरण पत्र आणि इतर सर्व गोष्टी या आॅनलाईन करण्यात येत आहे. त्यामुळे विभागाचा कोणताही अधिकारी इन्स्पेक्टर तपासणीसाठी दुकानांमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही, असे मत भट्टाचार्य यांनी व्यक्त केले.
व्हॅट, हॉलमार्क नोंदणीवरूनच नोंदणी
जे सराफ व्हॅट भरतात, हॉलमार्कसाठी त्यांनी नोंदणी केली आहे, त्यावरूनच सराफांची या करासाठी नोंदणी करण्यात येणार आहे. विभागाचे अधिकारी नोंदणीसाठी कोणाकडे जाणार नाहीत.
मात्र, नोंदणीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर व्हॅट नोंदणी व हॉलमार्कसाठी केलेल्या नोंदणीच्या आधारावर नोंदणी न करणाऱ्या सराफांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती भट्टाचार्य यांनी दिली.