क्षय, कुष्ठरोग आढळला; जिल्ह्यामध्ये ४ हजार रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 12:29 PM2019-09-24T12:29:05+5:302019-09-24T12:38:37+5:30

या मोहिमेंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील एकूण ५९ लाख ८५६ नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे...

tb and leprosy found; 4,000 patients in the district | क्षय, कुष्ठरोग आढळला; जिल्ह्यामध्ये ४ हजार रुग्ण

क्षय, कुष्ठरोग आढळला; जिल्ह्यामध्ये ४ हजार रुग्ण

Next
ठळक मुद्देप्रतिबंध जागरूकता अभियान : सर्वेक्षणात माहिती उघडसंबंधितांना औषधोपचार करण्याच्या सूचना; १९ हजार जणांना मधुमेह

पुणे : संयुक्त कुष्ठ रुग्ण, सक्रिय क्षय रुग्ण शोध मोहीम आणि असंसर्गजन्य रोग प्रतिबंध जागरुकता अभियानांतर्गत जिल्ह्यात सर्वेक्षण सुरू असून, या सर्वेक्षणात आतापर्यंत १ हजार ८१९ कुष्ठ रुग्ण, क्षयरोगांचे २ हजार २५ रुग्ण आढळले आहेत. यातील १५ रुग्ण बाधित असल्याची माहिती या सर्वेक्षणात उघड झाली आहे. त्याचबरोबर १९ हजार १०९ जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या असंसर्गजन्य रोगांची लागण झाल्याचे आढळले आहे. 
महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त केंद्रशासनाच्या सूचनांनुसार जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात संयुक्त कुष्ठ रुग्ण, क्षय रुग्ण शोध मोहीम आणि असंसर्गजन्य रोगप्रतिबंध जागरुकता अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी १३ सप्टेंबरपासून सर्वेक्षण सुरू असून, २८ सप्टेंबरपर्यंत ते चालणार आहे. या मोहिमेंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील एकूण ५९ लाख ८५६ नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. आशा सेविका आणि काही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून प्रत्येक घरी जाऊन नमुने घेण्यात येत आहेत. कुष्ठ रुग्णांच्या शोधासाठी त्वचेचे; तसेच इतर नमुने घेतले जात आहेत. क्षयरोगासाठी थुंकीचे नमुने तपासले जात आहेत; तसेच असंसर्गजन्य आजारासाठी प्रश्नावली तयार करण्यात आली असून, त्याद्वारे सर्वेक्षण केले जात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष गायकवाड यांनी दिली. 
आतापर्यंतच्या सर्वेक्षणात कुष्ठरोगाचे १ हजार ८१९ रुग्ण आढळले आहेत. त्यानुसार त्यांना औषोधोपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. क्षयरोगाचे आतापर्यंत तपासण्यात आलेल्या नमुण्यात जवळपास २ हजार २५ रुग्ण संशयीत आढळले आहे. यातील १५ रुग्णांना क्षयरोग झाल्याचे आढळले आहे. असंसर्गजन्य रोगांच्या सर्वेक्षणासाठी देण्यात आलेल्या प्रश्नावलीत आतापर्यंत १९ हजार १०९ रुग्णांना मधुमेह आणि उच्चरक्तदाब यासारखे आजार झाल्याचे आढळले आहे. हे सर्वेक्षण २८ तारखेपर्यंत चालणार असल्याने तिन्ही प्रकारांच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. 
.........

आशा सेविकांच्या संपाचा सर्वेक्षणाला फटका
पुणे जिल्ह्यात आशा सेविका आणि काही स्वयंसेवी संस्थांमार्फत हे सर्वेक्षण सुरू आहे. १३ सप्टेंबरपासून या प्रकाराला सुरुवात झाली; मात्र दरम्यानच्या काळात आशा सेविकांनी त्यांच्या मागण्यांचा संप पुकारला. एका आशाताईच्या गटाला २० घरांचे सर्वेक्षण करायचे होते; मात्र संप पुकारल्यामुळे सर्वेक्षणावर परिणाम झाला. 
.......
११ लाख ८६ हजार ९७२ घरांच्या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट
संयुक्त कुष्ठ रुग्ण, क्षय रुग्ण शोध मोहीम आणि असंसर्गजन्य रोग प्रतिबंध जागरूकता अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यात ११ लाख ८६ हजार ९७२ घरांची तपासणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील ४६ लाख १३ हजार ७०९ नागरिकांची, तर शहरी भागातील १३ लाख २१ हजार १६० रुग्ण असे दोन्ही मिळून ५९ लाख ८६५ नागरिकांची तपासणी केली जाणार आहे.
...........
बाधित रुग्णांना दिले जाणार योग्य उपचार
सर्वेक्षणात आढळलेल्या रुग्णांना रोगनिदानासाठी; तसेच उपचारांसाठी संदर्भ चिठ्ठी देऊन जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा महानगरपालिकेच्या रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे. त्यानुसार त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहे. 
 

Web Title: tb and leprosy found; 4,000 patients in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.