मेट्रोप्रमाणे रस्त्यांच्या दोन्ही बाजूला टीडीआर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 01:55 AM2019-02-08T01:55:19+5:302019-02-08T01:55:40+5:30
बहुप्रतीक्षित शहरातील अंतर्गत वर्तुळाकार रस्त्यासाठी (एचसीएमटीआर) येत्या दहा दिवसांमध्ये एक्स्प्रेशन आॅफ इंटरेस्ट मागवण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.
पुणे : बहुप्रतीक्षित शहरातील अंतर्गत वर्तुळाकार रस्त्यासाठी (एचसीएमटीआर) येत्या दहा दिवसांमध्ये एक्स्प्रेशन आॅफ इंटरेस्ट मागवण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.
पुणे शहरामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी एचसीएमटीआर प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी निधी उभा करण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करण्यात येत आहे. मेट्रोप्रमाणे एचसीएमटीआरच्या दोन्ही बाजूला ५०० मीटरपर्यंत टीडीआर (विकास हस्तांतरण हक्क), जाहिरात हक्क आणि कर्ज उभारणी अशा पर्यायांवर विचार करण्यात येत आहे. या प्रकल्पाला अधिक बळकटी मिळावी यासाठी राज्यशासनाची प्रकल्पाला मंजुरी घेण्यात येणार आहे. राज्यशासनाकडे यासंदर्भातील प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याचे राव यांनी सांगितले.
एचसीएमटीआर प्रकल्पासाठी मोठा निधी लागणार आहे. ३७ किलोमीटरच्या या रस्त्यासाठी ६ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे भूसंपादनासाठी आरक्षित भूसंपादन रोखे देण्याचा विचार महापालिका प्रशासन करत आहे. त्यामुळे भूसंपादनासाठी महापालिका प्रशासनाला रोख रक्कम मोजावी लागणार नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हा प्रकल्प योग्य असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता या प्रकल्पासाठी निधी उभारणीचे सर्वांत महत्त्वाचे काम यापुढील काळात करण्यात येणार आहे.
जाहिरात हक्क, टीडीआर आणि कर्ज उभारणी अशा पर्यायांचा अभ्यास सध्या महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे. पालिका सर्व पर्यायांचा विचार करून योग्य निर्णय घेणार आहे. महापालिकेने या प्रकल्पासाठी कर्ज उभारल्यास विविध पर्यायांच्या माध्यमातून कर्ज परतफेड होऊ शकते. पुणे महापालिकेची बाजारामधील पत उत्तम असल्यामुळे ८ ते ९ टक्के दराने आपल्याला कर्ज मिळू शकेल, असे राव यांनी सांगितले.
एचसीएमटीआर रस्त्यावर
३७ किलोमीटरची बीआरटी
पुणे शहरामध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनेक परदेशी कंपन्या आणि बँका उत्सुक आहेत. महामेट्रो कंपनीला फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सी या वित्तसंस्थेने शहरातील सार्वजनिक वाहतूक क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
यासंदर्भात दोन बैठका झाल्या आहेत. शहरात पार्किंग धोरण, मेट्रो आणि पीएमपी यांच्या मध्ये ससूत्रता, त्याचबरोबर बीआरटीचे विस्तारीकरण, बस खरेदीसाठी ही संस्था गुंतवणूक करण्यास तयार आहे. आपण त्यामुळे एचसीएमटीआर रस्त्यावर ३७ किलोमीटरचा बीआरटी प्रकल्प करणार असल्याचे राव यांनी सांगितले.