सहा मीटरपासूनच्या सर्वच रस्त्यावर टीडीआर वापरता यावा : मनसेची मनपा आयुक्तांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:10 AM2021-02-15T04:10:26+5:302021-02-15T04:10:26+5:30
पुणे : महाराष्ट नवनिर्माण सेनेने पूर्वीपासूनच शहरातील सर्वच ६ मीटरच्या रस्त्यावर टीडीआर वापरास मान्यता द्यावी, ही मागणी केली होती. ...
पुणे : महाराष्ट नवनिर्माण सेनेने पूर्वीपासूनच शहरातील सर्वच ६ मीटरच्या रस्त्यावर टीडीआर वापरास मान्यता द्यावी, ही मागणी केली होती. पण आता नव्या बदलाच्या नावाखाली पुणे शहरातील ३३५ रस्तेच यासाठी का निवडले? असा प्रश्न ‘मनसे’ने उपस्थित केला आहे.
याबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन मनसे पदाधिकाऱ्यांनी, ३३५ रस्त्यांच्या मान्य केलेल्या प्रस्तावात फक्त चारच रस्ते पेठांमधील आहेत आणि बाकीचे सगळे रस्ते काही ठराविक बिल्डरांच्या प्रकल्पासाठीच असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप केला आहे.
त्यामुळे १९९७ ते २०१७ या २० वर्ष कालावधीतील ६ मीटरपासून सर्वच रस्त्यावर जसा टीडीआर वापरता येत होता, तसाच नियम पुन्हा एकदा अंमलात आणावा, अशी मागणी केली आहे. मनसे शहराध्यक्ष अजय शिंदे यांच्यासह या वेळी उपशहर अध्यक्ष राम बोरकर, प्रल्हाद गवळी, सुनील कदम, राजेंद्र वेडे पाटील, विनायक कोतकर, वसंत खुटवड, सचिन काटकर, रमेश जाधव, अभिषेक थिटे आदी उपस्थित होते.
शिंदे यांनी सांगितले की, शहरातील सहा मीटर रुंदीचे रस्ते नऊ मीटर रुंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण ज्यांना पुनर्विकास करायचा नाही, त्यांना ''एफएसआय'', ''टीडीआर''च्या वापराची आवश्यकता नाही व त्यांनी त्यांच्या घरांसमोरील रस्ता नऊ मीटर रुंद केला नाही तरी चालणार आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. परंतु राज्याचे महसूलमंत्री राहिलेल्या पाटील यांनी, सहजपणे राज्य सरकारच्या नियमांना केराची टोपली दाखवण्याची भाषा केली आहे. त्यामुळे पुणे महापालिकेत या नियमाच्या संदर्भात पुढे काय होईल याबाबत शंका उपस्थित होत आहे. टीडीआर वापराबाबत असे गोंधळाचं वातावरण असेल तर नागरिकाचे प्रचंड हाल होऊन, मूळ उद्देश बाजूला राहून व्यावसायिक मंडळीचे फावणार असल्याकडेही शिंदे यांनी लक्ष वेधले.
-----//-----