पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमधील 'ते' प्रवेश संशयाच्या भोवऱ्यात; ACB कडून तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 08:00 PM2023-08-11T20:00:43+5:302023-08-11T20:29:52+5:30
डॉ. आशिष बंगीनवार यांची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात...
- किरण शिंदे
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीयमहाविद्यालयाचे डीन आशिष बंगीनवार यांना 10 लाख रुपयांची लाच स्वीकारताना आठ ऑगस्ट रोजी रंगेहात पकडण्यात आले होते. बंगीनवार यांना अटक केल्यानंतर आता या वैद्यकीयमहाविद्यालयात झालेले 'ते' प्रवेश संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून तीन टर्ममध्ये झालेल्या त्या 45 प्रवेशांबाबत पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यासोबतच या लाचप्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, यादृष्टीने देखील तपास सुरू करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक अमोल तांबे यांनी दिली आहे.
दोन वर्षापूर्वी स्थापन झालेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. आशिष श्रीनाथ बंगिनवार (वय 54) यांना लाचलुचपत विभागाने सोमवारी सायंकाळी 10 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुण्यातील राजकीय अनेक शिक्षण क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली.
पुणे महानगरपालिकेच्या या वैद्यकीय महाविद्यालयात शैक्षणिक वर्षात 100 प्रवेश होतात. त्यातील 15 प्रवेश मॅनेजमेंट कोट्यातून होतात. त्यानुसार, महाविद्यालय सुरू झाल्यानंतर पहिली बॅच मार्च 2022 मध्ये सुरू झाली. तर, दुसरी बॅच नोव्हेंबर 2023 मध्ये आणि तिसरी बॅच ऑगस्ट 2022 म्हणजे सध्या सुरू होते. प्रत्येक बॅचला 15 प्रवेश हे मॅनेजमेंट कोट्यातून झाले आहेत. त्यानुसार, दोन बॅचमधील 30 आणि सध्याच्या बॅचमधील मॅनेजमेंट कोट्यातून झालेले प्रवेश या लाच प्रकरणामुळे संशयात आले आहेत.
पुणे एसीबीकडून आता प्रवेश घेतलेल्या प्रत्येकाकडे चौकशी सुरू करण्यात आली आहे. संबंधितांना विचारणा करण्यात येत आहे. तर, प्रवेश घेण्यासाठी कोणाकडे लाचेची मागणी झाली का किंवा कोणाकडून लाच घेण्यात आली का, याची तपासणी केली जात आहे. तसेच, या लाचप्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, यादृष्टीने देखील एसीबीने चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
डॉ. आशिष बंगीनवार यांची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात-
महानगरपालिकेच्या या वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. आशिष बंगिनवार यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र त्यांची ही नियुक्ती आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. डॉ. आशिष बंगीनवार यांचा गुजरात व्हाया पुणे महापालिका वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठता असा प्रवास देखील आता चर्चेत आला आहे. ते अधिष्ठता होण्यापुर्वी गुजरातमधील सिल्वासा येथे एका वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक होते. तेव्हा त्यांना पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या पदाधिकारी भरतीबाबत जाहिरात माहिती मिळाली. त्यांनी या माहितीवरून त्यांनी त्या जाहिरातील नियमानुसार डीन पदाच्या प्रक्रियेसाठी अर्ज केले. त्यांची लेखी आणि मुलाखत देखील झाली व ते थेट वैद्यकीय महाविद्यालयेच अधिष्ठता झाले. २०२१ मध्ये ते अधिष्ठता झाले आहेत. पण, लाच प्रकरणानंतर या सर्व गोष्टी चर्चेत आल्या आहेत.