Tea: अमृततुल्यला ओहोटी, काॅर्पोरेट चहाला भरती, मांडणीवरच्या महाराजांचा पोटासाठी पूजापाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 09:45 AM2022-04-06T09:45:01+5:302022-04-06T09:45:21+5:30
Tea News: पुणे शहराची अमृततुल्य अशी एकेकाळी असलेली ओळख आता लयाला जाऊ लागली आहे. त्याची जागा काॅर्पोरेट लूक असलेल्या दुकानांची साखळी असलेल्या कंपन्या घेऊ लागल्या आहेत.
- राजू इनामदार
पुणे : शहराची अमृततुल्य अशी एकेकाळी असलेली ओळख आता लयाला जाऊ लागली आहे. त्याची जागा काॅर्पोरेट लूक असलेल्या दुकानांची साखळी असलेल्या कंपन्या घेऊ लागल्या आहेत. एक हजारपेक्षा जास्त अमृततुल्य असलेल्या पुणे शहरात सध्या केवळ २०० अमृततुल्य शिल्लक आहेत. त्यांनाही अखेरची घरघर लागली आहे.
कधीपासून आहेत अमृततुल्य?
सन १९२५पासून म्हणजे स्वातंत्र्याच्याही आधीपासून पुणे शहरात अमृततुल्य ही चहाची दुकाने सुरू झाली. पहाटे ५ वाजता चहाचा पहिला कप रस्त्यावर देवाला अर्पण करून सुरू होणार व रात्री ९ वाजता बंद होणार ही त्यांची खासीयत. मुंबईत जशी इराण्याची हॉटेल तशी पुण्यात अमृततुल्य. पोटापाण्यासाठी म्हणून पुण्यात आलेल्या राजस्थानी समाजातील दवे, बोरा अशा मंडळींनी कमी भांडवलातील म्हणून हा व्यवसाय सुरू केला.
कशी असतात ही दुकाने?
१० गुणिले १५ चौरस फुटांची किंवा त्यापेक्षा एखादी मोठी जागा. एका कोपऱ्यात ॲल्युमिनियम धातूची एक मांडणी, त्यावर महाराज बसलेले व त्याच्यासमोरच्या स्टोव्हवर एका पातेल्यात उकळत असलेले चहाचे आंधण. ही या दुकानांची ओळख, अमृततुल्य हे नाव सार्थ होईल, असा आले, वेलची घातलेला फर्मास चहा तिथे मिळतो. बसायला बाकडे, चहाचे कप ठेवायला टेबल, पाणी प्यायला ग्लास.
का लागली ओहोटी?
आकर्षक सजावट केलेल्या चहाच्या दुकानांनी अमृततुल्य हॉटेल चालकांना मात दिली असल्याचे दिसते आहे. जुने फर्निचर, जुनी सजावट यामुळे व्यवसाय कमी होऊन अमृततुल्य चालकांनीच आपली दुकाने या नव्या कंपन्यांच्या हवाली केल्याचीही उदाहरणे आहेत.
काय करतात चालक?
बहुसंख्य अमृततुल्य चालक राजस्थानी महाराज होते. त्यांनी दुकान बंद झाल्यावर पोटापाण्यासाठी पूजापाठ सांगण्यास सुरूवात केली, अशी माहिती मिळाली. काहींनी वेगळा व्यवसाय सुरू केला. अनेक वर्षांचे दुकान व्यवसायच होत नसल्यामुळे बंद करावे लागले, असे काहींनी सांगितले.
बदल हा तर व्हायलाच पाहिजे. आम्ही नवे चकचकीत फर्निचर आणले. स्टाईल नवी आणली. चहातही बदल केले. त्याचा फायदा आम्हाला होतो आहे. कोणाची दुकाने बंद व्हावीत, असा आमचा उद्देश नव्हताच.
- कॉर्पोरेट ट्रेडमार्क असलेल्या चहाच्या दुकानांचे चालक
आमच्यासारखा चहा कोणताही काॅर्पोरेट लूक चहावाला तयार करूच शकणार नाही. पुढील पिढीला आमच्या या व्यवसायात रस नाही. मांडणीवर दिवसभर बसायचे म्हणजे कष्ट लागतात. ते नव्या पिढीला जमत नाहीत. त्यामुळे अमृततुल्यचा बहर ओसरला.
- अजित बोरा, अध्यक्ष,
पुणे शहर अमृततुल्य चालक संघटना