अंगणवाडीसेविकांना आधी शिकवा ना इंग्लिश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:09 AM2021-07-30T04:09:38+5:302021-07-30T04:09:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : स्तनदा माता, गरोदर महिला आणि मुलांची माहिती अद्यावत ठेवण्यासाठी शासनातर्फे अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्यात ...

Teach English to Anganwadis first! | अंगणवाडीसेविकांना आधी शिकवा ना इंग्लिश!

अंगणवाडीसेविकांना आधी शिकवा ना इंग्लिश!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : स्तनदा माता, गरोदर महिला आणि मुलांची माहिती अद्यावत ठेवण्यासाठी शासनातर्फे अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्यात आले आहे. या सर्वांची माहिती पोषण ट्रॅकर अॅपमध्ये भरायची आहे. मात्र, ती सर्व इंग्रजी भाषेत भरावी लागत असल्याने अंगणवाडी सेविकांची अडचण होत आहे. इंग्रजी येत नसल्याने आता आम्ही यासाठी या वयात इंग्रजी शिकायची का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यात अनेक दुर्गम भागात रेंज नसल्याने ही माहिती भरण्यासाठी अडचणी येत आहेत.

अंगणवाडी सेविकांमार्फत जिल्ह्यातील स्तनदा माता, गरोदर महिला तसेच कुपोषित मुलांना अंगणवाडीच्या माध्यमातून सेवा दिली जाते. त्यांना पोषण आहार देण्यासोबतच त्यांची सर्व माहिती अंगणवाडी सेविकांना ठेवावी लागते. पुणे जिल्ह्यात जवळपास ४ हजार ६२३ अंगणवाड्या आहेत. त्यात जवळपास ३ हजार ९६२ अंगणवाडी सेविका या कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. अंगणवाडी सेविकांचे काम ‘स्मार्ट’ करण्यासाठी तसेच सर्व माहिती एका क्लिकवर मिळावी या हेतूने अंगणवाडी सेविकांना राज्याच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे मोबाईल देण्यात आले आहेत. आधी कॅश या अॅपवर गरोदर माता, स्तनता आणि लहान मुलांची माहिती भरावी लागत होती. मात्र, हे अॅप बंद पडले. यानंतर आला पोषण आहार ट्रॅकर हे नवे अॅप बनविण्यात आली असून यावर ही माहिती अंगणवाडी सेविकांना भरावी लागत आहे. मात्र, ही माहिती इंग्रजीमध्ये भरावी लागत असल्याने अंगणवाडी सेविकांची अडचण झाली आहे. अनेक सेविकांना इंग्रजी येत नसल्याने त्यांना हे अॅप वापरताना अडचणी येत आहेत. इतरांच्या मदतीने ही माहिती भरावी लागत आहे. यामुळे आता केवळ या अॅपसाठी आम्ही इंग्रजी शिकायची का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या अॅपमध्ये वरील माहिती भरण्यासाठी मराठीचा पर्याय असावा, अशी मागणी केल्या जात आहे.

चौकट

पोषण ट्रॅकरवरील कामे

जिल्ह्यातील गरोदर महिला ते स्तनदा माता, किशोरवयीन मुले-मुली, त्यांचे वजन या सारखी माहिती अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकवर भरण्याच्या सूचना आहेत. यासाठी त्यांना मोबाईल देण्यात आले आहेत. राज्य शासनाला सर्व जिल्ह्याची माहिती एका क्लिकवर मिळावी हा या मागचा हेतू आहे.

चौकट

मोबाईल आहे पण रेंज नाही...

खेड, आंबेगाव, जुन्नर, भोर, वेल्हा, मुळशी, मावळ तालुक्यात अनेक दुर्गम गावे आहेत. डोंगराळ प्रदेश त्यात मोबाईल टॉवरची कमतरता यामुळे या ठिकाणी मोबाईलला दिवसभर रेंज नसते. यामुळे या मोबाईलचा काहीच उपयोग होत नाही. त्यात इंटरनेट नसल्यामुळे ही माहिती अंगणवाडी सेविकांना भरताच येत नाही. रेंज असलेल्या ठिकाणी येऊन त्यांना ही माहिती भरावी लागते.

कोट

पोषण ट्रॅकवर माहिती भरतांना इंग्रजीची अडचण अंगणवाडी सेविकांना येत आहे. या बाबत अॅप डेव्हलपर्सला संपर्क साधण्यात आला होता. या अॅपच्या नव्या व्हर्जनमध्ये मराठीचा पर्याय देण्यात आला आहे. मात्र, तो विकास प्रक्रियेत आहे. येत्या काही दिवसांत ही समस्या दूर करण्यात येईल.

-दत्तात्रय मुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग

Web Title: Teach English to Anganwadis first!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.