पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी विद्यार्थ्यांना धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 02:24 AM2017-08-12T02:24:30+5:302017-08-12T02:24:30+5:30
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी विद्यार्थ्यांना धडे दिले जात आहेत. त्यासाठी पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा नुसता संदेश न देता, प्रदूषण रोखण्याच्या परिवर्तनाची वेगळी चळवळ येथील एन्व्हायर्न्मेंटल फोरम आॅफ इंडियाच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींची निर्मिती शालेय विद्यार्थ्यांनी स्वत: करून त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपापल्या घरी करावी, यासाठी फोरमने पुढाकार घेतला आहे.
बारामती : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी विद्यार्थ्यांना धडे दिले जात आहेत. त्यासाठी पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा नुसता संदेश न देता, प्रदूषण रोखण्याच्या परिवर्तनाची वेगळी चळवळ येथील एन्व्हायर्न्मेंटल फोरम आॅफ इंडियाच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींची निर्मिती शालेय विद्यार्थ्यांनी स्वत: करून त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपापल्या घरी करावी, यासाठी फोरमने पुढाकार घेतला आहे.
यंदा बारामतीतील १२ शाळांमध्ये फोरमने शाडूच्या मातीची २५० पोती दिलेली आहेत. प्रत्येक शाळेला गणेशमूर्तींचे साचेही दिलेले आहेत. याशिवाय, या मूर्ती तयार करण्यासाठी या १२ शाळांतील कलाशिक्षकांना एक दिवसाचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. मूर्ती रंगविण्यासाठी शाळांना रंगही फोरमच्या वतीने देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे रंगदेखील पर्यावरणपूरक आहेत.
यंदा प्रत्येक शाळेत ३०० अशा साडेतीन हजार मूर्ती विद्यार्थ्यांच्या हातातून साकाराव्यात आणि त्या पूर्णपणे पर्यावरणपूरक असाव्यात असा फोरमचा प्रयत्न आहे, अशी माहिती फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी दिली. प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीचे विघटन होत नसल्याने या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते.
हे प्रदूषण रोखणे, प्लॅस्टर आॅफ पॅरिसचा वापर कमी करून शाडूच्या मातीचा वापर वाढविणे, मुलांमधील कलागुणांना वाव देणे असे अनेक उद्देश या उपक्रमातून एकाच वेळी साध्य होतील, असे पवार यांनी सांगितले. बारामतीतील विविध शाळांमध्ये सध्या गणेशमूर्तींचे काम वेगाने सुरू आहे. मुले अत्यंत उत्साह व आनंदाने बाप्पांना साकारण्यात गुंग झाल्याचे चित्र शाळाशाळांतून दिसत आहे.
एखाद्या सेवाभावी संस्थेने
प्रदूषण रोखण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मदतीने ३ हजारांवर मूर्तींची निर्मिती करण्याची ग्रामीण भागातील ही पहिलीच वेळ आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजात प्रदूषण कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे पवार यांनी सांगितले.
विद्यार्थी बनणार संदेशदूत...
प्रदूषण रोखण्यासाठी शाडूच्या मातीच्या मूर्तींची निर्मिती व्हावी, यासाठी विद्यार्थ्यांना संदेशदूत करण्याचा फोरमचा प्रयत्न आहे. प्रत्येक कुटुंबातून प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न व्हावा, यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.