शिक्षकांना उत्तरपत्रिका घरी घेऊन जाता येईना ; पोलिसांच्या कारवाईची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 09:02 PM2020-03-26T21:02:54+5:302020-03-26T21:03:59+5:30

दहावीच्या उत्तरपत्रिका घरी तपासण्याची परवानगी शिक्षकांना देण्यात असली तरी त्यांना त्या शाळेतून घरी घेऊन जाताना अनेक अडचणी येत आहेत.

The teacher could not take the answer sheet home ; Fear of police action rsg | शिक्षकांना उत्तरपत्रिका घरी घेऊन जाता येईना ; पोलिसांच्या कारवाईची भीती

शिक्षकांना उत्तरपत्रिका घरी घेऊन जाता येईना ; पोलिसांच्या कारवाईची भीती

Next

पुणे: राज्य शासनाने शिक्षकांना घरी इयत्ता दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करण्यास परवानगी दिली असली; तरी शाळांमधून या उत्तरपत्रिका घरी आणण्यात शिक्षकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर मार्ग काढावा, अशी मागणी मुख्याध्यापक महामंडळातर्फे करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. तसेच इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा पेपर पुढे ढकलण्यात आला. सध्या इयत्ता दहावी बारावीच्या उत्तरपत्रिका विविध शाळा ,महाविद्यालयांमध्ये मुख्याध्यापक व प्राचार्यांच्या कस्टडीत ठेवण्यात आले आहेत. शिक्षकांना घरी उत्तरपत्रिका तपासणीचे काम करता येऊ शकेल, असा निर्णय नुकताच घेण्यात आला. मात्र सध्या राज्यात संचारबंदी आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. परिणामी शिक्षकांना  शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन उत्तरपत्रिका घेता येत नाही. तसेच मुख्याध्यापक व प्राचार्यांना उत्तरपत्रिका शिक्षकांना देण्यासाठी बाहेर पडता येत नाही. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणी विलंब होण्याची शक्यता मुख्याध्यापक महामंडळाकडून व्यक्त केली जात आहे.

इयत्ता बारावीच्या सुमारे 60 टक्के उत्तरपत्रिका तपासून झालेल्या आहेत. तसेच बहुतांश शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी आणल्या आहेत. मात्र, इयत्ता बारावीच्या परीक्षांच्या तुलनेत दहावीच्या परीक्षा उशिरा सुरू झाल्या. त्यामुळे इयत्ता दहावीच्या केवळ 30 टक्के उत्तरपत्रिका तपासून झाल्या आहेत. शिक्षक घराबाहेर पडल्यास पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. उत्तर पत्रिका आणण्यास शाळा-महाविद्यालयांमध्ये जाण्यासाठी शासनाने शिक्षकांना मुभा दिली तर उत्तरपत्रिकांची तपासणी वेळेत होऊ शकते. त्यासाठी राज्य मंडळाने याबाबत शासनाला पत्रव्यवहार करणे अपेक्षित आहे. असे मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष विजय सिंह गायकवाड यांनी सांगितले.

शाळा-महाविद्यालयांमध्ये उत्तरपत्रिका आणण्यासाठी जाणार्‍या शिक्षकांना मुख्याध्यापकांना पोलीस यंत्रणेकडून अडविले जात आहे.संचारबंदीनंतरच शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासण्याचे काम करावे,असे पोलिस प्रशासनाकडून सांगितले जात आहे. राज्य शासनाने शिक्षकांना उत्तरपत्रिका घेऊन जाण्यासाठी परवानगी दिल्याचे कोणतेही पत्र उपलब्ध नाही, असे काही पोलिसांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे राज्य मंडळाने यामध्ये लक्ष घालावे, यासाठी मुख्याध्यापक महामंडळाच्या वतीने राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ.शकुंतला काळे यांच्याकडे पाठपुरावा केला जाणार आहे.

- विजयसिंह  गायकवाड, अध्यक्ष, मुख्याध्यापक महामंडळ, महाराष्ट्र राज्य

Web Title: The teacher could not take the answer sheet home ; Fear of police action rsg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.