केस वाढले म्हणून शिक्षकांनी भर वर्गातच कापले विद्यार्थ्याचे केस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 07:01 PM2018-07-25T19:01:05+5:302018-07-25T19:11:41+5:30
सहावीच्या विद्यार्थ्याचे वर्गातच केस कापल्याने त्याला चांगलाच मानसिक धक्का बसला. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या पालकांनी विश्रांतवाडी पाेलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली अाहे.
पुणे : सहावीच्या वर्गातील विद्यार्थ्याचे केस वाढले म्हणून शाळेच्या शिक्षकांनी वर्गातच विद्यार्थ्याचे केस कापल्याची घटना विश्रांतवाडीतील पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे घडली. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांसमाेर शिक्षकांनी केस कापल्याने विद्यार्थ्याला माेठा मानसिक धक्का पाेहचला. याप्रकरणी मुलाच्या अाईने विश्रांतवाडी पाेलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली अाहे. या तक्रारीवरुन तीन महिला व एक पुरुष शिक्षक, शिक्षिका, शाळेचे उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक व शाळेच्या संस्थाचालकावर गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विश्रांतवाडी भागातील टिंगरेनगर येथील पुणे इंटरनॅशनल स्कूलच्या सहावी इयत्तेतील एका विद्यार्थ्याचे तीन महिला शिक्षीका व एक पुरुष शिक्षकाने भर वर्गात केस कापून त्याल विद्रुप केले. या अाधीही शाळेच्या एका शिक्षिकेने केस वाढले म्हणून त्या विद्यार्थ्याची वर्गात वेणी घातली हाेती. त्यावेळी त्याच्या पालकांनी याकडे दुर्लक्ष केले हाेते. परंतु शिक्षकांनी भर वर्गात विद्यार्थ्याचे केस कापल्याने मुलाला चांगलाच मानसिक धक्का पाेहचला. याबाबत मुलाच्या पालकांनी शाळेच्या उपमुख्याध्यापकांना फाेन करुन सर्व प्रकार सांगितला असता शिक्षकांवर कारवाई करण्याएेवजी उपमुख्यध्यापकांनी पालकांना उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान विश्रांतवाडी पाेलिस या घटनेचा अधिक तपास करीत अाहेत.