शिक्षक जकात नाक्यावर
By admin | Published: March 11, 2016 01:38 AM2016-03-11T01:38:11+5:302016-03-11T01:38:11+5:30
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रशासनाने सहा शिक्षकांच्या बदल्या केल्या असून, त्यातील दोन शिक्षकांच्या जकात नाक्यावर बदल्या करण्यात आल्या आहेत
देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रशासनाने सहा शिक्षकांच्या बदल्या केल्या असून, त्यातील दोन शिक्षकांच्या जकात नाक्यावर बदल्या करण्यात आल्या आहेत. ऐन परीक्षेच्या तोंडावर बदल्या केल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने पालकांतून नाराजी व्यक्त होत आहे
शिक्षकांच्या बदल्यांबाबत बोर्डाच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष विशाल खंडेलवाल यांना अंधारात ठेवून बदल्या केल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांनी गेल्या वर्षभरात बोर्डाच्या शाळांतील पटसंख्या वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांना एक प्रकारे खो घातला जात आहे. जकात नाक्यांवर काम करणाऱ्या शिक्षकांची संख्या १२ झाली असल्याने शाळांबाबत कॅन्टोन्मेंट बोर्डाचा अजब कारभार दिसून येत आहे.
बोर्डाच्या जकात नाक्यांवरील पारगमन शुल्क व वाहन प्रवेशशुल्क वसुली करण्याचा ठेका संबंधित ठेकेदाराने गेल्या दीड वर्षापूर्वी अचानक सोडून दिल्याने पाच सप्टेंबरला शिक्षक दिनी आठ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्या वेळी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचे कारण पुढे करीत थोड्या दिवसांसाठीच बदल्या केल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र,आजतागायत नाक्यावरील शिक्षकांची संख्या कमी झाली नसून, वाढत चालली आहे. शिक्षकांच्या बदल्यांबाबत प्रशासनाने अतिरिक्त शिक्षक असल्याने बदल्या झाल्याचे सांगितले आहे. वास्तविक सहा महिन्यांपूर्वी (सप्टेंबर महिन्यात) बोर्डाच्या सर्व शाळांची पटनिश्चिती झाल्यानंतर बोर्डाच्या बैठकीत सात शिक्षक अतिरिक्त असल्याचे जाहीर करून त्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मार्च महिन्यात शिक्षकांच्या बदल्या होणे पालक व शिक्षक यांना अपेक्षित नव्हते. आता पुन्हा अतिरिक्त व प्रशासकीय कारणास्तव बदल्या केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
मात्र,ऐन परीक्षांच्या तोंडावर सहा शिक्षकांच्या अचानक बदल्या केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. पालकांसह शिक्षकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहेत. (वार्ताहर)