शिक्षक भरती : स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ, १४ दिवसांत केवळ सव्वा लाख अर्ज

By प्रशांत बिडवे | Published: September 14, 2023 04:54 PM2023-09-14T16:54:05+5:302023-09-14T16:54:40+5:30

दरम्यान, इंटरनेट तसेच इतर अडचणींमुळे प्रक्रिया पूर्ण करू न शकलेल्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे...

Teacher Recruitment: Extension of time to complete self certification, only half a lakh applications in 14 days | शिक्षक भरती : स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ, १४ दिवसांत केवळ सव्वा लाख अर्ज

शिक्षक भरती : स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ, १४ दिवसांत केवळ सव्वा लाख अर्ज

googlenewsNext

पुणे :शिक्षक पदभरतीसाठी उमेदवारांना दि. १५ सप्टेंबर पर्यंत स्व- प्रमाणपत्र पूर्ण करण्याची मुदत दिली हाेती. मात्र, परीक्षा दिलेल्या २ लाख १६ हजार ४४३ उमेदवारांपैकी १४ सप्टेंबर पर्यंत केवळ १ लाख २६ हजार ४५३ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली असून ९४ हजार ९४८ उमेदवारांचे स्व- प्रमाणपत्र प्रमाणित झाले आहेत. त्यामुळे उमेदवारांना स्व- प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी येत्या २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे अशी माहिती शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दिली. दरम्यान, इंटरनेट तसेच इतर अडचणींमुळे प्रक्रिया पूर्ण करू न शकलेल्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

राज्यातील जिल्हा परिषद शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पाेर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक पदभरतीसाठी राज्य शासनाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ टेट परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने दि. २२ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ या कालावधीमध्ये आयाेजन केले हाेते. टेट परीक्षेसाठी २ लाख ३९ हजार ७३० उमेदवारांनी नोंदणी केली असून २ लाख १६ हजार ४४३ उमेदवारांनी परीक्षा दिली हाेती.

पवित्र पोर्टलवर परीक्षा दिलेल्या उमेदवारांना दि. १ ते १५ सप्टेंबर या कालावधीमध्ये स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी सुविधा दिलेली आहे. मात्र, राज्यातील काही भागामध्ये इंटरनेट सुविधा व्यवस्थितरित्या सुरु नाही. त्यामध्ये दि.१४ सप्टेंपर्यंत केवळ ९५ हजार उमेदवारांचे स्व प्रमाणपत्र पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. दिलेल्या मुदतीत https://tait२०२२.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर स्व- प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण करावी. जे उमेदवार स्व-प्रमाणपत्र पूर्ण करणार नाहीत ते उमेदवार नव्याने होणाऱ्या शिक्षक पदभरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरणार नाहीत.

अडचण आल्यास करा ईमेल तक्रार

पाेर्टल संदर्भात अथवा स्व- प्रमाणपत्र प्रमाणित करण्यात काही अडचण आल्यास edupavitra२०२२@gmail.com या ईमेलवर तक्रार करावी. त्यास उत्तर देण्यात येईल. यासाठी काेणतेही कर्मचारी, अधिकारी अथवा त्रयस्थ व्यक्तीशी संपर्क साधू नये असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

पवित्र पाेर्टलवरील सद्यस्थिती

नाेंदणी केलेले उमेदवार : १ लाख २६ हजार ४५३

प्रक्रिया अपूर्ण : १६ हजार २३५

प्रमाणित : ९४ हजार ९४८

अप्रमाणित : ६८४

Web Title: Teacher Recruitment: Extension of time to complete self certification, only half a lakh applications in 14 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.