खासगी संस्थांमधील शिक्षक भरती गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करणार: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 01:37 PM2021-01-28T13:37:18+5:302021-01-28T13:38:03+5:30
राज्यातील सहा हजार शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार
पुणे: जिल्ह्यातील काही खासगी संस्थांमधील शिक्षकांच्या भरती प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकाराबाबत आजी-माजी शिक्षण अधिका-यांवर गुन्हा दाखल झाला असून शिक्षण विभागाकडूनही याबबात चौकशी केली जाईल,असे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
बालभारतीच्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत गायकवाड बोलत होत्या. यावेळी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, बालभारतीचे संचालक दिनकर पाटील, प्राथमिक शिक्षण संचालक दतात्रय गायकवाड, राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर टेमकर आदी उपस्थित होते.
गायकवाड म्हणाल्या, राज्यातील सहा हजार शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असून शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाच्या भरतीबाबतही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. शिक्षक भरती पवित्रपोर्टलच्या माध्यमातूनच राबविली जाणार आहे. इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती व शिक्षक सेवक मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.
शालाबाह्य विद्यार्थ्यांचा प्रश्न गंभीर असून सर्व समाजाने या विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शिक्षण विभागातर्फे त्यासाठी स्वतंत्र अॅप तयार केले जाणार आहे,असेही गायकवाड म्हणाल्या.