‘शिक्षक आपल्या दारी’ उपक्रम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 02:35 AM2018-06-15T02:35:53+5:302018-06-15T02:35:53+5:30
दीर्घ सुट्टीच्या आनंदानंतर जेव्हा विद्यार्थी शाळेत येतील तेव्हा त्यांना त्यांची शाळा हवीहवीशी वाटली पाहिजे. यासाठी पहिल्या दिवशीच शाळा परिसर स्वच्छ करून, सडा टाकून त्यावर रांगोळ्या काढण्यात येणार आहेत. तसेच परिसरातील उपलब्ध पाना-फुलांचे तोरण करून खोल्या व परिसर सुशोभित करण्यात येणार आहे.
राजेगाव - दीर्घ सुट्टीच्या आनंदानंतर जेव्हा विद्यार्थी शाळेत येतील तेव्हा त्यांना त्यांची शाळा हवीहवीशी वाटली पाहिजे. यासाठी पहिल्या दिवशीच शाळा परिसर स्वच्छ करून, सडा टाकून त्यावर रांगोळ्या काढण्यात येणार आहेत. तसेच परिसरातील उपलब्ध पाना-फुलांचे तोरण करून खोल्या व परिसर सुशोभित करण्यात येणार आहे.
राज्यातील नवीन शैक्षणिक वर्षांच्या शाळा शुक्रवारी (दि. १५) सुरू होत असून, सर्वत्र शाळा प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शाळा परिसर स्वच्छ, आनंदी आणि प्रेरणादायी असल्यास सुट्टीनंतर बालकांना शाळेची ओढ लागेल. त्यांची पावलं आपोआपच शाळेच्या दिशेने वळू लागतील. पदयात्रा काढून नव्याने प्रवेश घेणाऱ्या बालकांच्या घरी भेटी देऊन त्यांना पहिल्याच दिवशी शाळेत येण्यासाठी सांगितले गेले.
शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा परिसरात स्वच्छता व सुशोभीकरण करण्यात येणार असून, शिक्षकांनी वेळेवर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सकाळी गावातील प्रमुख रस्त्यावरून प्रभातफेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व कार्यक्रमांसाठी गावातील प्रमुख पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती, क्रीडा मंडळे, तरुण मंडळे, महिला बचत गटाच्या सदस्य व विविध सामाजिक संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी स्थानिक पदाधिकाºयांना निमंत्रित करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांची व्यापक प्रसिद्धी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पहिल्या दिवशी मध्यान्ह भोजन योजनेत गोड पदार्थाचा समावेश करून विद्यार्थ्यांना मिष्टान्नाचा आस्वाद दिला जाणार आहे.
स्थानिक कलाकार अथवा माजी विद्यार्थी यांच्या शिक्षणाबाबत सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रोत्साहन देऊन त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. दरम्यान, राजेगाव (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक अप्पासाहेब मेंगावडे व सर्व शिक्षकांनी शाळा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी (दि. १४) रोजी गावातून पदयात्रा काढून नव्याने प्रवेशित होणाºया बालकांच्या घरी भेटी देऊन त्यांना पहिल्याच दिवशी शाळेत दाखल होण्यासाठी ‘शिक्षक आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गुणात्मक वाटचालीची अपेक्षा
दि. १५ रोजी शाळेला सुरुवात होत आहे. हा शुभारंभ चैतन्यमय आणि उत्साहवर्धक झाल्यास शिक्षक व विद्यार्थी यांना गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळते ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन सर्वत्र शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहेत. त्यासाठी अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना सर्व शाळाप्रमुखांना देण्यात आल्या आहेत.
- गोरक्षनाथ हिंगणे, गटशिक्षणाधिकारी
दीर्घ सुट्टीच्या आनंदानंतर जेव्हा विद्यार्थी शाळेत येतील तेव्हा त्यांना त्यांची शाळा हवीहवीशी वाटली पाहिजे. शाळा परिसर स्वच्छ, आनंदी आणि प्रेरणादायी असल्यास सुट्टीनंतर बालकांना शाळेची ओढ लागेल आणि त्याची पावले आपोआपच शाळेच्या दिशेने वळू लागतील. यासाठी आनंदी वातावरण तयार करण्यासाठी शिक्षकांना सूचित करण्यात आले आहे.
- नंदा धावडे, केंद्रप्रमुख राजेगाव