आरोग्य प्रशिक्षणाला शिक्षकांची वानवा

By Admin | Published: February 4, 2016 01:42 AM2016-02-04T01:42:19+5:302016-02-04T01:42:19+5:30

शालेय वयातील मुलांचे आरोग्य चांगले राहण्याच्या दृष्टीने राज्यशासनाकडून जंतनाशक दिन मोहीम राबविण्यात येणार आहे.

Teacher Training for Health Training | आरोग्य प्रशिक्षणाला शिक्षकांची वानवा

आरोग्य प्रशिक्षणाला शिक्षकांची वानवा

googlenewsNext

पुणे : शालेय वयातील मुलांचे आरोग्य चांगले राहण्याच्या दृष्टीने राज्यशासनाकडून जंतनाशक दिन मोहीम राबविण्यात येणार आहे. येत्या १० व १५ फेब्रुवारीदरम्यान असणारी ही मोहीम शालेयस्तरावर राबविली जाणार असून, त्याचे प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नसल्याने महापालिकेसमोर अडचण निर्माण झाली आहे.
पहिली ते बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या ६ ते १९ वर्षे वयोगटातील प्रत्येक मुलाने या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य कुटुंब कल्याण कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक मुलाला जंताची एक चघळण्याची गोळी देण्यात येणार असून, ती गोळी विद्यार्थ्याने शिक्षकांसमोर खाऊन त्यानंतर पाणी प्यायचे आहे. याबाबत योग्य ती माहिती देण्यासाठी शिक्षकांना एकत्रित प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. मात्र, मुंबई येथे शिक्षकांच्या चालू असणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात पुण्यातील महानगरपालिकेच्या ३६ शाळांतील शिक्षक सहभागी झाले आहेत. त्यामुळे शिक्षकांना हे प्रशिक्षण कसे द्यायचे, असा प्रश्न पालिकेच्या आरोग्य विभागासमोर आहे. त्यामुळे सध्या खासगी शाळातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे काम चालू असल्याचे पालिकेच्या लसीकरण विभागाच्या सहायक आयुक्त डॉ. कल्पना बळीवंत यांनी सांगितले. नुकतीच यासंबंधीची बैठक घेण्यात आली असून, शिक्षण विभागातील सहायक शिक्षणप्रमुखांना त्याबाबत माहिती देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. या मोहिमेअंतर्गत १० फेब्रुवारी रोजी मुलांना शाळेतून ही गोळी देण्यात येणार आहे. मात्र, काही अपरिहार्य कारणांमुळे विद्यार्थी ही गोळी घेऊ शकला नाही तर त्याला ती १५ तारखेला देण्यात येईल. यामध्ये सर्व शासकीय शाळा, शासकीय अनुदानित शाळा, आश्रमशाळा व महानगरपालिका, सर्व खासगी अनुदानित शाळा व ग्रामीण व शहरी अंगणवाडी केंद्रांमध्ये ही मोहीम राबविली जाणार आहे.
या मोहिमेसाठी शाळा व अंगणवाडी स्तरावरील शिक्षक
तसेच अंगणवाडीसेविका यांना जिल्हास्तर, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय या सर्व स्तरांवर प्रशिक्षण दिले जाणार आहे.
लहान मुलांमधील कृमीदोष ही भारतातील मोठी समस्या असून, अश ाप्रकारची मोहीम हा त्यावरील उत्तम उपाय आहे. यासाठीच केंद्रशासनाने हा पुढाकार घेतला असून, जास्तीत जास्त मुलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आले आहे. राज्यातील २६ जिल्हे तसेच २३ शहरांची निवड या मोहिमेसाठी करण्यात आली आहे.

Web Title: Teacher Training for Health Training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.