शिक्षकांनाही हवे निवडणुकीचे रिंगण
By admin | Published: January 11, 2017 02:40 AM2017-01-11T02:40:20+5:302017-01-11T02:40:20+5:30
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांबरोबरच आता जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांसह प्राध्यापकांनीही दंड थोपटले आहेत
पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांबरोबरच आता जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांसह प्राध्यापकांनीही दंड थोपटले आहेत. इच्छुकांमध्ये डॉक्टर, वकील व ठेकेदारांचाही समावेश आहे.
दरमहा ५०-६० हजारांच्या नोकऱ्या असतानाही जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य होण्याचे डोहाळे शिक्षकांना लागले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज घेण्यात आलेल्या इच्छुकांच्या मुलाखतीत स्पष्ट झाले.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जिल्हा राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या तालुकानिहाय मुलाखती घेण्यास सुरुवात झाली.
मार्केट यार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयात सकाळी ९ वाजल्यापासून पक्षाचे नेते अजित पवार यांनी मुलाखती घेण्यास सुरुवात केली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, महिलाध्यक्षा वैशाली नागवडे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यानिमित्ताने मुलाखतीच्या दरम्यान अनेक गमतीजमतीही अनुभवायला मिळाल्या. तसेच अनेक स्तरांतील लोक राजकारणात उतरू पाहत असल्याचे चित्र स्पष्ट झाले.
हवेली, बारामती, इंदापूर, दौंड, भोर, वेल्हा आणि पुरंदर तालुक्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. उद्या बुधवारी (दि.११) रोजी हवेली, जुन्नर, मावळ, शिरुर, आंबेगाव, खेड आणि मुळशी तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.
राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांमध्ये यावेळी प्रथमच मोठ्या प्रमाणात शिक्षक, प्राध्यापक, वकिल, डॉक्टर आणि खाजगी ठेकेदारांचे प्रमाण वाढले होते. मुलाखती दरम्यान अजित पवार यांच्यादेखील ही बाब लक्षात आल्याने पन्नास-साठ हजारांच्या नोकऱ्या सोडून राजकारणात का येता अशी विचारणाही त्यांनी केली. समाजकारणाची आवड असल्याचे उत्तर इच्छुकांनी दिले.
तुम्ही तर माझ्याच पोटावर पाय द्यायला निघालात...
४मी पुणे विद्यापीठात प्रथम आलो.. पीएच.डी.ही केली अन् गेल्या तीस वर्षांपासून प्राध्यापक म्हणून नोकरी करतोय... पण सुरुवातीपासूनच समाजकारणाची आवड असल्याने महाविद्यालयात सर्व जण मला आमदारच म्हणतात... तुम्ही बारामती तालुक्यातून पंचायत समितीसाठी उमेदवारी दिली तर आमदारकीची पूर्वतयारी करता येईल.... असे मुलाखतीत सांगितल्यावर संपूर्ण सभागृहात हशा पिकला. यावर अजित पवार यांनीदेखील त्वरित ‘तुम्ही तर माझ्याच पोटावर पाय द्यायला निघालात,’ असे म्हटले.
महिलांच्या जागेसाठी पतिराजांच्या मुलाखती
इंदापूर तालुक्यातील निमगांव केतकी-निमसाखर गट महिलांसाठी राखीव झाला असून, याच गटातील निमसाखर गण देखील महिलेसाठी राखीव आहेत. जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. परंतु दोन्ही ठिकाणी इच्छुक महिलाऐवजी त्यांचे पतीराजांंनीच मुलाखती दिल्या. मुलाखतीलाच ही परस्थिती तर पाच वर्ष महिला काय काम करणार असा प्रश्न उपस्थित केला.
दौंडची बिघडलेली स्थिती सुधारण्यासाठी राष्ट्रवादीला मतदान
४दौंड तालुक्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्यानंतर अजित पवार यांनी
सांगितले की, पक्ष उमेदवारी देईल, त्याचे प्रामाणिकपणे काम करा, तालुक्यात साखर कारखान्यासह इतर अनेक गोष्टीची वाट
लागली आहे. कारखाना पुर्ववत करायचा असेल तर राष्ट्रवादी काँगे्रसला विशेष प्रयत्न करावे लागतील.
दोन ‘वैशालीं’ची उमेदवारी निश्चित
दौंड तालुक्यातील राहू-खामगाव जिल्हा परिषद गटामध्ये एकाही इच्छुक महिलेने अर्ज न भरल्याने मुलाखती दरम्यानच अजित पवार यांनी व्यासपीठार उपस्थित असलेल्या जिल्हा राष्ट्रवादी काँगे्रसच्या महिला अध्यक्षा वैशाली नागवडे यांची उमेदवारी जाहीर केली. 'मी सांगेन तिथे लढावे लागेल' असे सांगत सज्जड दमही दिला. दरम्यान इंदापूर तालुक्यातदेखील कळस-वालचंदनगर या गटांसाठी एकही अर्ज न आल्याने माजी सभापती वैशाली पाटील यांची उमेदवारी निश्चित असल्याचे या वेळी स्पष्ट झाले.