कोरोना नियंत्रण मोहिमेतील शिक्षकांना विमाकवच नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:13 AM2021-04-30T04:13:14+5:302021-04-30T04:13:14+5:30

पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोना नियंत्रण मोहिमेत काम करणाऱ्या बावधन व धनकवडी भागातील प्रत्येकी एका शिक्षकाचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. ...

Teachers in the Corona control campaign are not insured? | कोरोना नियंत्रण मोहिमेतील शिक्षकांना विमाकवच नाही?

कोरोना नियंत्रण मोहिमेतील शिक्षकांना विमाकवच नाही?

Next

पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोना नियंत्रण मोहिमेत काम करणाऱ्या बावधन व धनकवडी भागातील प्रत्येकी एका शिक्षकाचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. या घटनेला सुमारे एक वर्ष पूर्ण होत आले. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पालिकेच्या इतर विभागातील कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांना २५ लाख रुपयांच्या विम्याची रक्कम देण्यात आली आहे. मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांना सुमारे एक कोटी रुपयांची आर्थिक मदत विम्याच्या रकमेच्या स्वरूपात दिली जाणार आहे. परंतु, मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या नातेवाइकांना अद्याप कोणत्याही प्रकारची मदत केलेली नाही.

पुणे महानगरपालिकेत एकूण २ हजार २०० शिक्षक असून त्यातील कोरोना नियंत्रण मोहिमेत ७५० शिक्षक काम करत आहेत. या शिक्षकांना सलग ४५ दिवस काम केल्यानंतर दुसऱ्या ७५० शिक्षकांना काम दिले जाते. परंतु ,वय वर्ष ५५ च्या पुढील शिक्षकांना या कामातून वगळण्यात आले आहे. अधिकाधिक शिक्षकांना कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम दिल्यामुळे अनेक शिक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, असे शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

-----------------

कोरोना नियंत्रण मोहिमेत पुणे महानगरपालिका परिसरातील सुमारे ७५० शिक्षकांची सेवा घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची संख्या वेगळी आहे. पालिका हद्दीतील दोन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. परंतु, अद्याप एकाही मृत्यू झालेल्या शिक्षकाच्या कुटुंबीयांना विम्याची रक्कम देण्यात आली नाही.

----------------

पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दोन शिक्षकांना कोरोना काळात आपले प्राण गमवावे लागले. परंतु, अद्याप त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही आर्थिक मदत करण्यात आली नाही. संबंधित शिक्षकांच्या पत्नीला पेन्शनही सुरू झालेली नाही. शिक्षकांना प्रामुख्याने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम करावे लागत आहे. त्यामुळे अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच या कामाची जबाबदारी केवळ शासकीय शिक्षकांना देण्यात आली आहे. खासगी शिक्षकांना या कामासाठी नियुक्त करण्यात आलेले नाही.

- सचिन डिंबळे, पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना

------------

सर्वेक्षण, नियंत्रण कक्ष आणि कोविड सेंटरला नोंदणीसाठी शिक्षकांना नियुक्त करण्यात आले आहे. विविध तालुक्‍यांमध्ये अनेक शिक्षक नियंत्रण मोहिमेत काम करत आहेत.

- सुनील कुऱ्हाडे, प्राथमिक, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद

--------------------

माझ्याकडे कोरोना नियंत्रण मोहिमेअंतर्गत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची जबाबदारी दिले आहे. शासकीय शिक्षकांनाच या मोहिमेत घेण्यात आले आहे. खासगी शिक्षकांचासुद्धा या मोहिमेत अंतर्भाव करण्यात आला, तर इतर शिक्षकांवरील भार कमी होईल. सर्व काळजी घेऊन शिक्षक कोरोना विरुद्धच्या लढ्यात प्रशासनाला सहकार्य करत आहेत.

- पोपट पाटील, शिक्षक, पुणे महानगरपालिका

Web Title: Teachers in the Corona control campaign are not insured?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.