भोर तालुक्यात शिक्षकांना एक महिन्यापासून पगार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 01:28 PM2019-08-29T13:28:07+5:302019-08-29T13:29:41+5:30
भोर तालुका दुर्गम डोंगरी असून, १५५ ग्रामपंचायती व १९६ गावे वाड्यावस्त्या आहेत. जिल्हा परिषदेच्या २७६ प्राथमिक शाळा असून, शिक्षकांच्या ८१५ पैकी ७२३ शिक्षक कार्यरत आहेत.
भोर : भोर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना मागील एक महिन्यापासून पगार झाला नाही. त्यामुळे तालुक्यातील ८१५ पैकी ७२३ शिक्षकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पंचायत समिती शिक्षण विभागाला कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी नसल्याने शिक्षण विभागातील अनेक कामे रखडत असून सावळा गोंधळ आहे. त्यामुळे पूर्णवेळ शिक्षणाधिकारी देण्याची मागणी होत आहे.
भोर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ३७६ प्राथमिक, तर ४८ माध्यमिक विद्यालये आहेत. यातील अनेक शाळा दुर्गम डोंगरी भागात असून, सुमारे २१ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १२२५ शिक्षक कार्यरत आहेत. ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधांचा अभाव आहे. शिक्षक कमी आहेत. या सर्वांच्या नियोजनासाठी मागील साडेतीन वर्षांपासून प्रभारी गटशिक्षणाधिकारी काम करतात. आठवड्यात मंगळवारीच भोरला हजर असतात. त्यामुळे अनेक कामे रखडत असून, शिक्षण विभागात सावळा गोंधळ सुरू आहे. त्यामुळे पंचायत समितीला कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी आवश्यक आहे. तरच भोरची शैक्षणिक गुणवत्ता सुधारणार असून, रखडलेल्या पगारांसह कामे वेळेत होणार आहेत.
भोर तालुका दुर्गम डोंगरी असून, १५५ ग्रामपंचायती व १९६ गावे वाड्यावस्त्या आहेत. जिल्हा परिषदेच्या २७६ प्राथमिक शाळा असून, शिक्षकांच्या ८१५ पैकी ७२३ शिक्षक कार्यरत आहेत.
पंचायत समिती शिक्षण विभागाने लेखा विभागात अद्याप पगार बिले सादर केलेली नाहीत. ऑगस्ट महिना संपत आला तरी तालुक्यातील ७२३ शिक्षकांना अद्याप पगार मिळालेला नाही. एक महिन्याचा पगार जवळपास ४ कोटी रुपये असून, दर महिन्याला पगारबिले पाच तारखेपर्यंत पंचायत समितीच्या लेखा विभागात जातात आणि सात तारखेपर्यंत सदरचे पगार शिक्षकांच्या खात्यावर जमा होतात. मात्र ऑगस्ट महिना संपला तरी अद्याप जुलै महिन्याचा पगार मिळालेला नाही. त्यामुळे गणेशोत्सव सण कसा साजरा करायचा, हा प्रश्न प्राथमिक शिक्षकांसमोर उभा राहिला आहे. दोन शिक्षकांच्या वेतनवाढीमुळे संपूर्ण शिक्षकांना वेठीस धरले जात असल्याचे बोलले जात आहे.शिक्षण विभागाने लेखा विभागाकडे बिले जमा केलेली नाहीत. दोन शिक्षकांच्या वेतनवाढीच्या प्रश्नामुळे पगार उशिराने होत असल्याचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी सांगितले.
.......
तीन प्रभारी गटशिक्षणाधिकारी झाले...
मागील ३ वर्षांपासून भोर पंचायत समितीमधील कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी नसून आत्तापर्यंत ३ प्रभारी गटशिक्षणाधिकारी झाले आहेत.
.....
सध्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी जिल्हा परिषदेत कार्यरत असून, भोरचा प्रभारी चार्ज त्यांच्याकडे असल्याने जिल्हा परिषदेचे कामकाज बघून नंतर भोरला वेळ द्यावा लागतो.
.....
मंगळवार बाजाराचा दिवस आणि महत्त्वाचे कार्यक्रम वगळता प्रभारी ग. शि. भोरला हजर नसतात. त्यामुळे पंचायत समितीच्या शिक्षण विभागाची अनेक कामे रखडत आहेत. यामुळे भोरला कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी देण्याची मागणी होत आहे.