शिक्षकांचा मोर्चा; बदल्यांचा अध्यादेश रद्द करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 04:20 AM2017-11-05T04:20:37+5:302017-11-05T04:20:43+5:30
राज्याच्या शिक्षण विभागाने २७ फेब्रुवारीचा बदल्यांचा अध्यादेश व २३ आॅक्टोबर रोजी घेतलेला वेतनश्रेणी व निवडश्रेणी संदर्भातील निर्णय रद्द करावा, प्राथमिक शिक्षकांची आॅनलाइन कामे बंद करावीत, नोव्हेंबर २००५पासून सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना निवृत्तीवेतन लागू करावे.
पुणे : राज्याच्या शिक्षण विभागाने २७ फेब्रुवारीचा बदल्यांचा अध्यादेश व २३ आॅक्टोबर रोजी घेतलेला वेतनश्रेणी व निवडश्रेणी संदर्भातील निर्णय रद्द करावा, प्राथमिक शिक्षकांची आॅनलाइन कामे बंद करावीत, नोव्हेंबर २००५पासून सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना निवृत्तीवेतन लागू करावे, आदी मागण्यांसाठी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वयक समितीतर्फे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांनी मोठ्या संख्येने मोर्चा काढला. या मोर्चात सहभागी शिक्षकांनी शासनाच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. पुण्यातही मोर्चा काढून शिक्षकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. शिक्षक नेते संभाजी थोरात यांच्या नेतृत्वात पुण्यात मोर्चा काढण्यात आला.
- जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या मोर्चात शेकडो शिक्षक सहभागी झाले होते. मोर्चात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, शिक्षक समिती, मागासवर्गीय शिक्षक संघटना, उर्दू प्राथमिक शिक्षक संघटना, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, राज्य शिक्षक परिषद, एकल शिक्षक मंच यांसह अन्य शिक्षक संघटनांचा सहभाग होता. मोर्चाच्या सुरुवातीला आमदार कपिल पाटील यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.