शिक्षिकांनीच लैंगिक अत्याचारात गुंतविले, शिक्षक निर्दोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 12:02 AM2018-10-06T00:02:50+5:302018-10-06T00:03:08+5:30
शिक्षकाची निर्दोष मुक्तता : बाल लैंगिक अत्याचाराचा होता गुन्हा
बारामती : माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिक्षकाची बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातून निर्दाेष मुक्तता करण्यात आली. शासकीय आयटीआय माळेगाव येथे नेमणुकीस असलेले शिक्षक शिवाजी बडे यांच्यावर ११ मार्च २०१४ रोजी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात न्या. ए. एस. आवटे यांच्यासमोर खटला चालला होता. परीक्षा केंद्रामध्ये कामावर असताना विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
साक्षीदारांच्या उलटतपासणीत या खटल्यात अत्यंत गंभीर व धक्कादायक समोर आलेली बाब म्हणजे, बडे ज्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात नोकरीला होते, त्याच केंद्रातील ३ महिला शिक्षकांनी या केंद्रातील ३७ मुलींवर दबाव टाकला. या मुलींना तुमच्या परीक्षेचा निकाल आमच्या हातात आहे, अशी भीती दाखवून बडे यांच्या विरोधात महिला दिनाचे औचित्य साधून अश्लील स्वरूपाच्या खोट्या तक्रारी देण्यास भाग पाडले. यामध्ये एका विद्यार्थिनीस फिर्याद नोंदवायला लावली होती. बडे व त्यांची पत्नी माजी पोलीस कर्मचारी आहे. दोघांनी मॅट न्यायालयामधून आदेश आणून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून नोकरीस घेण्यास वरिष्ठ प्रशासनास भाग पाडले होते. त्याचा राग व आकस प्रशासनातील लोकांना होता. परंतु, बडे यांच्या विरोधात तक्रार देऊनही, त्यातील काही विद्यार्थिनींना सदसद्विवेकबुद्धी सुचली. यातील एका विद्यार्थिनीने न्यायालयापुढे साक्ष दिली, की तीन महिला शिक्षकांनी ३५ ते ४० मुलींची बैठक घेतली. आमच्यावर दबाव टाकून बडे सरांविरोधात खोट्या व अश्लील स्वरूपाचे आरोप असलेल्या लेखी तक्रारी त्यांनी द्यायला लावल्या.
उशिरा दाखल केली तक्रार
हा खटला बारामती सत्र न्यायालयात सव्वाचार वर्षे चालला. सरकारी पक्षाला त्यांच्या विरोधात साक्ष देण्यासाठी सात साक्षीदार मिळाले; परंतु ते विश्वासार्ह नव्हते. कारण पीडित मुलगी अथवा साक्षीदार यांनी कथित घटनेनंतर तत्काळ मुख्याध्यापक अगर पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार नोंदविली नव्हती.
त्यामुळे त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या उद्देशाने उशिरा तक्रार दाखल केल्याचा युक्तिवाद आरोपींचे वकील अॅड. विशाल बर्गे यांनी केला. तसेच, बचाव पक्ष (बडे) यांच्यातर्फे अॅड. विजयराव बर्गे यांनी साक्षीदार तपासून सदरील खटला प्रथमदर्शनी खोट्या स्वरूपाचा असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.