शिक्षकांकडून निमोणे आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:14 AM2021-09-05T04:14:22+5:302021-09-05T04:14:22+5:30

शिरूर तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी एकत्र येऊन निमोणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास एक रुग्णवाहिका प्रदान केली. या रुग्णवाहिकेच्या ...

Teachers provide ambulance to Nimone Health Center | शिक्षकांकडून निमोणे आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका प्रदान

शिक्षकांकडून निमोणे आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका प्रदान

Next

शिरूर तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी एकत्र येऊन निमोणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास एक रुग्णवाहिका प्रदान केली. या रुग्णवाहिकेच्या लोकार्पणप्रसंगी पवार बोलत होत्या. या वेळी पुणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन समितीच्या माजी सभापती सुजाता पवार यांच्यासह शिरूर पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील, शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कोरनासारख्या महामारीत अनेकांना अत्यंत बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागलेले आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व शिक्षकांनी आपले एकदिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले होते. याशिवाय शिरूर तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी ठराविक रक्कम जमा करून तालुक्यातील रुग्णांसाठी काहीतरी भरीव काम करण्याचे निश्चित केले होते. त्यासाठी एक समन्वय समितीची स्थापना केली होती. या माध्यमातून माध्यमिक शिक्षकांनी साधारण साडेसहा लाख रुपये आणि प्राथमिक शिक्षकांनी साधारण नऊ लाख रुपये असा निधी स्वयंस्फूर्तीने जमा केला होता. त्या मधून साधारण आठ लाख रुपये किमतीची सुसज्ज अशी एक रुग्णवाहिका निमोणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला सुपूर्द केली तर उर्वरित रकमेचे रुग्णांना उपयुक्त ठरतील असे साहित्य देण्याचे नियोजन आहे.

या रुग्णवाहिका प्रधान सोहळ्याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या माजी सभापती सुजाता पवार, शिरूर तालुका पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील, शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र काळे, शिरूर तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयसिंह नलवडे, राजेसाहेब लोंढे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी इंदिरा ड्यानिअल, सरपंच श्याम काळे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अनिल महाजन, तालुकाध्यक्ष रमेश थोरात, जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष माऊली पुंडे, तालुकाध्यक्ष संतोष थोपटे, पुणे जिल्हा शिक्षक समितीचे कार्याध्यक्ष अविनाश चव्हाण, तालुकाध्यक्ष सतीश नागवडे, शिरूर पदवीधर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र नवले, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे समन्वयक दादासाहेब गवारे, माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे जिल्हा सचिव मारुती कदम, शिरूर तालुकाध्यक्ष तुकाराम बेनके, प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमन स्वाती करपे यासह मोठ्या प्रमाणावर प्राथमिक व माध्यमिक शिक्षक उपस्थित होते.

ग्रामपंचायत सदस्य संजय काळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तर, शशिकांत काळे यांनी आभार मानले.

कोणत्याही संकटसमयी शिरूर तालुक्यातील सर्व शिक्षक, मायबाप जनतेच्या मदतीला धावून जात असतात. या वेळीही सर्व शिक्षकांनी स्वयंस्फूर्तीने हा उपक्रम राबवला आहे.

- शिवाजीराव वाळके - समन्वयक - प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, शिरूर

निमोणे तालुका शिरूर येथे शिक्षकांच्या वतीने दिलेल्या रुग्णवाहिका लोकार्पण प्रसंगी मान्यवर.

Web Title: Teachers provide ambulance to Nimone Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.