मोठी बातमी! पुण्यात शिक्षकांच्या पगाराची बोंब; तब्बल ३ हजार शिक्षकांचे पगार रखडले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 06:15 PM2022-11-24T18:15:16+5:302022-11-24T18:15:28+5:30

जिल्हा परिषद शिक्षकांचे पगार एक तारखेला करण्याबाबत उच्च न्यायालयाचे निर्देश

Teachers salary stop in Pune The salaries of nearly 3 thousand teachers were stopped | मोठी बातमी! पुण्यात शिक्षकांच्या पगाराची बोंब; तब्बल ३ हजार शिक्षकांचे पगार रखडले

मोठी बातमी! पुण्यात शिक्षकांच्या पगाराची बोंब; तब्बल ३ हजार शिक्षकांचे पगार रखडले

googlenewsNext

बारामती : पुणे जिल्ह्यात शिक्षकांचे पगार निधीअभावी रखडले आहे. दिवाळीपूर्वीचे पगार तब्बल महिनाभरानंतर उशिरा करण्यात आले. त्यातही एकट्या जिल्ह्यात ३००० शिक्षकांना अद्याप दिवाळीचा पगार मिळाला नसल्याने शिक्षकांमध्ये संतापाची भावना असल्याची माहिती पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.

जिल्हा परिषद शिक्षकांचे पगार एक तारखेला करण्याबाबत उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. राज्य विधिमंडळात देखील वेळोवेळी याबाबत निर्णय झालेले आहेत. शासनाने वेळेवर पगार होण्यासाठी सीएमपी प्रणाली सुरू केली. मात्र तरी देखील पगाराबाबतची दिरंगाई काही केल्या कमी होताना दिसत नाही. 
दरवर्षीप्रमाणे दिवाळीपूर्वी पगार करण्यास शिक्षण विभागास अपयश आले. दिवाळीनंतर देखील पुणे जिल्ह्यातील १३ पैकी १० तालुक्यांचे पगार करण्यात आले. बारामती, खेड, दौंड या तीन तालुक्यांचे अनुदान कमी असल्याने पगार अद्याप करण्यात आलेले नाहीत. 

राज्य शासनाकडून तरतूद उपलब्ध होत नसल्याचे कारण जिल्हा परिषदेकडून सांगितले जात आहे. याउलट राज्याच्या शिक्षण संचालकांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. शिक्षकांचे पगार वेळेवर होत नसल्याबाबत खुलासा मागितला आहे .जिल्हा परिषदांनी सण अग्रीम, पुरवणी बिले यासारख्या कारणासाठी वेतनाची रक्कम खर्च केल्याचे संचालक कार्यालयाचे मत आहे.

जिल्हा परिषद आणि शिक्षण संचालक कार्यालय यांच्या टोलवाटोलवीत शिक्षकांचा मात्र कोंडमारा झाला आहे. अनेक शिक्षकांची गृहकर्ज, बँका, पतसंस्था यांची कर्ज हप्ते यासाठी उशीर झाल्याने दंडव्याजाचा भुर्दंड भरावा लागत आहे ,अशी माहिती जिल्हा सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली.

पुढील महिन्यांतही अपुरा निधी

पुणे जिल्हा परिषदेला शिक्षकांच्या पगारासाठी दरमहा ९० कोटींची गरज आहे. या महिन्यांत फक्त ५५ कोटीचा निधी मिळाला. त्यातही मागील महिन्यातील ३ तालुक्याचे पगार करावे लागणार असल्याने पुढील महिन्यात तब्बल ९ तालुक्यातील शिक्षकांना पगाराची वाट पहावी लागणार आहे.

''राज्य सरकार व जिल्हा परिषदा यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे पुरेशी तरतूद उपलब्ध होत नाही, शिक्षण विभागाचे हे अपयश असून राज्यव्यापी आंदोलनाशिवाय पर्याय नाही. - बाळासाहेब मारणे, जिल्हाध्यक्ष शिक्षक संघ, पुणे''

Web Title: Teachers salary stop in Pune The salaries of nearly 3 thousand teachers were stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.