शिक्षकांसाठी सणसरचे पालक उतरले रस्त्यावर
By admin | Published: May 8, 2017 01:49 AM2017-05-08T01:49:22+5:302017-05-08T01:49:22+5:30
सणसर (ता. इंदापुर) येथे पालकांसाठी शिक्षक रस्त्यावर उतरले. जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी राज्य शासनाने लागू
लोकमत न्यूज नेटवर्क
भवानीनगर : सणसर (ता. इंदापुर) येथे पालकांसाठी शिक्षक रस्त्यावर उतरले. जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी राज्य शासनाने लागू केलेल्या सुगम-दुर्गम बदलीच्या धोरणाला विरोध करण्यासाठी रविवारी( दि ७) सणसर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शिक्षक बदल्या विरोधात सणसर विकास मंच तीव्र आंदोलन ऊभारणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. नविन बदली धोरणाने शाळा, शिक्षक, गुणवत्ता यावर वाईट परीणाम होणार आहे. सणसर येथील जिल्हा परीषद शाळेचा लोकसहभागातून ग्रामस्थांनी कायापालट केला आहे.
३० लाखाहुन अधिक विकासकामे पुर्ण करण्यात आली आहेत. मात्र, दरम्यान प्राथमिक शिक्षकांसाठी शिक्षण विभागाने सेवाज्येष्ठतेचा अवलंब करणारे व सोपी बदली-अवघड बदलीचे सूत्र नव्याने अंमलात आणण्याचे ठरविले आहे. त्यासाठी सध्या शाळांमधून, तालुक्यांच्या शिक्षण विभागाकडून माहिती व आकडेवारी जमा केली जात आहे. मात्र, या वर्षभरात प्राथमिक सरकारी शाळांकडे ग्रामस्थांचा कल वाढत आहे. तेथे शाळा व शिक्षकांची घडी बसवली जात असताना शासन नव्याने धोरण आणले आहे. त्यातुन ही घडी विस्कटवत असल्याची शिक्षकांची भावना आहे. त्यामुळे त्या भावनेला आज सणसर विकास मंच व ग्रामस्थ, पालकांनी रास्ता रोको आंदोलन केले. रविवारी (ता. ७) येथील इंदापूर-बारामती रस्त्यावर सकाळी नऊ वाजता ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतुक विस्कळीत झाली होती. छत्रपती कारखान्याचे संचालक रणजित निंबाळकर, जाचकवस्तीचे माजी उपसरपंच विक्रमसिंह निंबाळकर, राष्ट्रवादीचे सागर भोईटे, शिक्षक संघटनेचे नेते दत्तात्रेय तोरसकर, रविंद्र खवळे, किशोर भोईटे आदींनी यावेळी सरकारी धोरणाचा निषेध केला. तर कॉंग्रेसचे नेते संग्रामसिंह निंबाळकर, यात्रा समितीचे अध्यक्ष रोहित निंबाळकर, अमोल भोईटे, बजरंग रायते, वसंत जगताप यांच्यासह मंचाचे सदस्य व ग्रामस्थांनी आंदोलनात सहभाग घेतला.
पालक पुन्हा रस्त्यावर उतरतील: निंबाळकर
सरकार किंवा अगदी खात्याचा सचिव जरी बदलला तरी बदल्यांचे धोरण बदलते. त्यामुळे असे धोरण बदलावे. अन्यथा जूनपासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षात शाळा बंद राहतील. पालक रस्त्यावर पुन्हा उतरतील, असा इशारा रणजित निंबाळकर यांनी दिला.