शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शिक्षक संघटनेचा पदाधिकारी व मुख्याध्यापक संभाजी शिरसाटला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 12:31 PM2021-01-16T12:31:28+5:302021-01-16T12:32:57+5:30
बनावट मान्यतापत्राद्वारे वेतन देयक तयार करुन शासनाची फसवणूक, आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई
पुणे : शिक्षक संघटनेचा पदाधिकारी आणि मुख्याध्यापक संभाजी शिरसाट याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. खोट्या व बनावट वैयक्तिक मान्यता तयार करुन त्या खर्या असल्याचे भासवून त्या आधारे वेतन देयके तयार करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात संभाजी शिरसाट याला अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक राजेंद्र बाबासाहेब साठे यांनी समर्थ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार संभाजी शिरसाट याच्यासह सुबोध शिक्षण संस्थेचे सचिव गौरव अशोक कदम, तात्कालीन वेतन पथक अधीक्षक भविष्य निर्वाह निधी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जून २०१६ ते सप्टेंबर २०१६ नंतर अद्यापपर्यंत घडला असल्याचे म्हटले आहे. आरोपींनी संगनमत करुन सुबोध शिक्षण संस्थेचे लिपिक व शिपाई यांच्या खोट्या व बनावट वैयक्तिक मान्यता तयार केल्या. त्या खर्या असल्याचे भासवून त्याआधारे वेतन देयके तयार करुन वेतन पथक प्राथमिक यांच्याकडे पाठवून वेतनापोटी एकूण १ लाख ४६ हजार ६०३ रुपयांची शासनाची फसवणूक केली आहे.
शिक्षक भरतीसाठी बनावट कागदपत्रे तयार करुन शिक्षणाधिकार्यांच्या संगनमताने बनावट भरती केल्याप्रकरणी आॅक्टोंबर २०१९ मध्ये बंडगृार्डन पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. त्यात २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने दोन दिवसांपूर्वी ६ ठिकाणी छापे घालून काही कागदपत्रे व बनावट शिक्के जप्त केले आहेत. पोलिसांच्या या कारवाईनंतर आता शिक्षण विभागातील विविध पथके कार्यन्वित झाली असून त्यातून शुक्रवारी रात्री अकरा वाजता समर्थ पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.