शिक्षकत्व ही नोकरी नव्हे; व्रत : डॉ. प्र.चिं शेजवलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 08:05 PM2019-11-29T20:05:31+5:302019-11-29T20:10:05+5:30
विद्यार्थ्यांना वर्गात आणि वर्गाबाहेर ही शिक्षक हवे हवेसे वाटले पाहिजेत...
पुणे: उत्तम अध्यापन हाच शिक्षकांचा खरा धर्म आहे.अध्यापनात केवळ पाटया टाकून चालत नाही .शिक्षकांनी ज्ञानदान करण्याबरोबर ज्ञानयोजक झालं पाहिजे. विद्यार्थ्यांना वर्गात आणि वर्गाबाहेर ही शिक्षक हवे हवेसे वाटले पाहिजेत .शिक्षकत्व ही नोकरी नाही, व्रत आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ व्यवस्थापन तज्ञ डॉ प्र.चिं शेजवलकर यांनी केले.
उत्कर्ष प्रकाशनाच्या वतीने डॉ. शेजवलकर लिखित ''आम्ही विद्याव्रती आणि यशस्वी जीवनाचे व्यवस्थापन'' या पुस्तकाचे प्रकाशन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ अशोक कामत आणि डॉ सुधीर राशिंगकर यांच्या हस्ते तर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांच्या लय भारी या विनोदी कथा संग्रहाचे प्रकाशन लेखक श्याम भुर्के यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रकाशक सु. वा. जोशी उपस्थित होते
डॉ. शेजवलकर म्हणाले, कोणताही माणूस एका रात्रीत मोठा होत नाही. व्यवस्थापन कौशल्याबरोबर अपार मेहनत करण्याची तयारी हवी.सुसंवाद साधण्याचे आणि विचार करण्याचे कौशल्य आत्मसात केल्यास माणूस यशस्वी होतो. मनात असेल तर स्वत:त बदल करणे सहज शक्य आहे.
डॉ. कामत म्हणाले, ज्याचे यश निर्भेळ असते आणि ज्याच्या यशाने इतरांना आनंद होतो तोच माणूस खरा यशस्वी असतो.ज्यांच्याकडे नीतिमूल्ये नाहीत. असत्य मेव जयते हाच ज्यांच्या धर्म आहे अशीच माणसे आज आपल्या दुदैवार्ने राजकारणात आहेत.अशा काळात समाजाला आपल्या कामातून शिक्षकच बळ देऊ शकतात.
प्रा जोशी म्हणाले,काही वर्षांपूर्वी जीवनाच्या सर्व क्षेत्रात शिक्षकांचा प्रभाव होता. अत्रे, पुल ,साने गुरुजी आणि ग प्र प्रधान यांनी लोकशिक्षकांची भूमिका बजावली. आज शिक्षकांचे तेज का लुप्त झाले आहे याचे चिंतन केले पाहिजे. आर्थिक समृद्धी येत असताना ज्ञानाची श्रीमंतीही वाढली पाहिजे.शिक्षकांच्या जागलेपणात विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाची ज्योत प्रज्वलित होत असते म्हणूनच शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे.
भुर्के यांनी निर्मळ माणूसच निखळ विनोद निर्माण करू शकतो. विनोदामुळे मन निर्मळ होते. उत्तम विनोदी लेखन करण्यासाठी सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि विनोद बुद्धी हवी असल्याचे सांगितले.
सु वा जोशी यांनी प्रास्ताविक केले . सुधीर राशिंगकर यांनीही मनोगत व्यक्त केले. विनय वाघ यांनी आभार मानले.
--------------------------------------------------------------------------------------