अमित शहांकडून पोलीस अधिकाऱ्यांची शिकवणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 09:59 PM2019-12-06T21:59:27+5:302019-12-06T22:00:55+5:30
पोलीस महासंचालकांच्या सुरक्षा परिषदेस सुरुवात
पुणे : देशभरातील पोलीस महासंचालकांच्या राष्ट्रीय पातळीवरील सुरक्षा परिषदेस शुक्रवारी सुरुवात झाली. यात देशभरातील पोलीस महासंचालक या परिषदेत सहभागी झाले असून शुक्रवारी दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मार्गदर्शन केले. आज (शनिवार) या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार असून शुक्रवारी रात्री ते लोहगाव विमानतळावर दाखल झाले.
पाषाण रस्त्यावरील आयसर (भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधनसंस्था) संस्थेच्या आवारात परिषद होत आहे. या परिषदेस सुरुवात झाल्यानंतर दुपारच्या सत्रात शहा यांनी देशभरातील पोलीस महासंचालकांना मार्गदर्शन केले. या निमित्ताने एका पुस्तिकेचे प्रकाशन शहा यांच्या हस्ते करण्यात आले. परिषदेचा मुख्य विषय न्यायवैद्याकीय आणि शास्त्रीय तपास आहे. तंत्रज्ञानातील बदलांवर तसेच देशाअंतर्गत सुरक्षेवर या परिषदेत चर्चा केली जाणार आहे.
तीन दिवसांच्या परिषदेची सांगता रविवारी (९ डिसेंबर) होणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सल्लागार अजित डोवाल, उपसल्लागार दत्ता पडसलगीकर यांच्यासह १८० पेक्षा जास्त वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले आहेत. या परिषदेच्या निमित्ताने आयसर संस्थेच्या आवारात तसेच पाषाण, बाणेर रस्त्यावर शुक्रवारी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहा यांचे दुपारी लोहगाव येथील हवाई दलाच्या तळावर आगमन झाले. हवाई दल अधिकारी एअर कमोडोर राहुल भसीन, केंद्रीय गुप्तचर विभागाचे प्रमुख अरविंद कुमार,राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल, पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर तसेच भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष योगेश गोगावले, जयंत येरवडेकर आदी या प्रसंंगी उपस्थित होते.