संघर्षाचा वसा जपण्याची शिकवण - पंकजा मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 01:01 AM2018-12-25T01:01:44+5:302018-12-25T01:02:11+5:30

गोपीनाथ मुंडे बहुजनांचे नेते होते. त्यांच्यातील पिता आणि नेता या दोन्ही भूमिका मी पाहिल्या आहेत. सामान्यांसाठीच्या संघर्षाचा वसा त्यांच्या नेत्याच्या भूमिकेतून मी घेतला आहे.

teachings of fighting struggle - Pankaja Munde | संघर्षाचा वसा जपण्याची शिकवण - पंकजा मुंडे

संघर्षाचा वसा जपण्याची शिकवण - पंकजा मुंडे

पिंपरी - गोपीनाथ मुंडे बहुजनांचे नेते होते. त्यांच्यातील पिता आणि नेता या दोन्ही भूमिका मी पाहिल्या आहेत. सामान्यांसाठीच्या संघर्षाचा वसा त्यांच्या नेत्याच्या भूमिकेतून मी घेतला आहे. सामान्यांच्या डोळ्यांत त्यांनी पाहिलेले स्वप्न खऱ्या अर्थाने सत्यात उतरविणे हेच माझे कर्तव्य मानले आहे. गोपीनाथ मुंडे यांची तू सुधारित आवृती हो, असे ते मला सांगून गेले आहेत, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पित्याच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला.
लोकनेते गोपीनाथ मुंडे जयंती कृती समिती पिंपरी-चिंचवड शहर, तसेच मराठवाडा जनविकास मंच, गोपीनाथ मुंडे फाउंडेशनच्या वतीने चिंचवड येथे आठवणीतले मुंडेसाहेब कार्यक्रम झाला. आमदार
लक्ष्मण जगताप, माधुरी मिसाळ, बालहक्क आयोगाचे प्रवीण घुगे, नगरसेवक केशव घोळवे, योगिता नागरगोजे, उद्योजक आबासाहेब नागरगोजे, मराठवाडा जनविकास मंचाचे अरुण पवार, शैलजा मोळक, राजस्थानचे आमदार जस्सीराम कोहली, खंडू खेडकर, बालहक्क आयोगाच्या सदस्या स्वरदा बापट उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री मुंडे म्हणाल्या, वडिलांशी माझे मैत्री आणि सहजतेचे नाते होते. त्यांच्या संघर्षाच्या काळात त्यांनी मला बरोबरीचा दर्जा दिला. माझ्या बहिणींना त्यांच्यातील पिता ही भूमिका माहिती आहे. मी त्यांच्यातील नेता पाहिला, जाणून घेतला. अहंकार त्यांना कधीही शिवला नाही, कधी कोणाला धोका दिला नाही. माणसे जोडण्याची कला त्यांना अवगत होती. विरोधकालाही आपलेसे करण्याचे कसब त्यांच्याकडे होते. काही
तरी अपेक्षेने मुंडे साहेबांशी
जवळीक साधलेले, त्यांना चिकटलेले होते, ते त्यांच्या निधनानंतर आमच्यापासून दूर गेले. जे त्यांच्या विचारांशी बांधील होते, ते आताही सोबत आहेत. जाण्यापूर्वी त्यांनी मला मौलिक सल्ला दिला, मला ज्यांना टाळता आले नाही, त्यांच्यापासून तू दूर राहा. तूच गोपीनाथ मुंडे आहेस, माझ्याकडून जे राहिले ते तू समाजासाठी कर. त्यांनी पाहिलेले स्वप्न साकार करण्याचा माझा प्रयत्न राहील.
पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर म्हणाले, की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी मानसपुत्र मानले. लढण्याचे, संघर्षाचे बळ दिले. त्यांच्या स्मारकासाठी दहा लाख रुपये आमदार निधीतून देणार आहे.
पालकमंत्री गिरीश बापट यांनी, लोकनेते मुंडे यांचा सहवास लाभला. दळणवळण सुविधा नव्हत्या, वाहनव्यवस्था नव्हती, त्या काळात प्रसंगी एसटीने प्रवास करणारा नेता अशी त्यांची ओळख होती. पुणे महापालिकेचा अध्यक्ष असतानाच्या काळात आम्ही त्यांना मोटार घेऊन दिली होती.
माजी आमदार गोविंदराव केंद्रे म्हणाले, ‘‘डाव्या आघाडीचा कार्यकर्ता असूनही मी त्यांच्याशी झालेल्या भेटीने प्रभावित झालो. सर्कस चालविणे जसे जिकिरीचे असते, तशा पद्धतीचे त्यांचे काम होते.
कोकण म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील म्हणाले, ‘‘रायगडसारख्या जिल्ह्यात कार्यकर्ता म्हणून पाय रोवून उभे राहण्याचे धारिष्ट्य मला केवळ लोकनेते मुंडे यांच्यामुळे मिळाले.’’
महापौर राहुल जाधव, लोकलेखा समितीचे अ‍ॅड. सचिन पटवर्धन, भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

आमच्याकडे माणसांची वाटणी
सगळीकडे संपत्तीची वाटणी होत असते. आमच्याकडे मराठवाड्यात मात्र माणसांची वाटणी होताना दिसून येते. जवळची, नात्यातील माणसे विभागली जातात. स्वभाव, गुण यावरून वाटणी होत असते, असे घराणेशाहीतील वाद, मतभेदाचे सूचक वक्तव्य ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. तसेच माजी आमदार गोविंदराव केंद्रे यांनी त्यास दुजोरा दिला.

अधिकाºयांनीही सांगितल्या आठवणी
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी लोकनेते मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते गृहमंत्री होते, त्या काळात १९९५ मध्ये त्यांच्याशी पहिली भेट झाली. पोलीस अधीक्षक म्हणून काम करीत असताना, जाहीर कार्यक्रमावेळी एका भाजपा नेत्याशी वाद झाला. परंतु त्यांच्यातील नेतेगिरी कधी त्यांनी जाणवू दिली नाही. कधीही चुकीचे काम करण्याचा आग्रह धरला नाही. लक्ष्मीनारायण या वरिष्ठ पोलीस अधिकाºयाशी एकदा ते थेट बोलले, तुम्ही माझे काम करीत नाही. उलटे काम करता; परंतु तुम्ही चांगले अधिकारी आहात, असा स्पष्टवक्तेपणा त्यांच्यात होता.

पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) अध्यक्ष किरण गिते म्हणाले, की २०१३ मध्ये त्रिपुरात काम करीत होतो. मला महाराष्टÑात बदली करून घ्यायची होती. त्रिपुराचे मुख्यमंत्री सोडण्यास तयार नव्हते. बदलीच्या कामासाठी लोकनेते मुंडे यांच्याकडे दिल्लीत गेलो. ते लोकसभेचे उपनेते होते. त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांनी बदलीचा प्रश्न मार्गी लावला. त्या वेळी आवाज देताच, पंतप्रधान कार्यालयातून त्यांच्याकडे अदबीने धावून येणारे अधिकारी पाहिले, तेव्हा त्यांच्यातील लोकनेता खºया अर्थाने अनुभवला.

Web Title: teachings of fighting struggle - Pankaja Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.