घराण्याची शिकवण पालकांच्या संस्कारांप्रमाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 02:04 AM2018-10-05T02:04:08+5:302018-10-05T02:04:42+5:30

संजीव अभ्यंकर : गानसरस्वती पुरस्कार जाहीर

The teachings of the household like parental sentiments | घराण्याची शिकवण पालकांच्या संस्कारांप्रमाणे

घराण्याची शिकवण पालकांच्या संस्कारांप्रमाणे

Next

गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या नावाने मिळत असलेला ‘गानसरस्वती पुरस्कार’ हा किशोरीतार्इंचा आशीर्वादच आहे, असे मी मानतो. रसनिष्पत्ती आणि बुद्धिजीविता यांचे अफाट मिश्रण त्यांच्या गाण्यात होते. त्या केवळ महान गायिकाच नाही; तर उत्तम गुरू होत्या. त्यांच्या गाण्यामधून खूप काही शिकण्यासारखे होते. त्यांच्या नावाचा पुरस्कार जाहीर झाल्याने प्रेम आणि आदर या दोन्ही भावना दाटून आल्या आहेत. या पुरस्काराला वलय तर आहेच; तसेच त्यामध्ये प्रेमाचा ओलावाही आहे.

संगीतातील लयकारी, स्वर लावण्याची पद्धत, ताल कोणते वापरावेत, गायन मांडण्याचा वेग, तिन्ही सप्तकांचा वापर, मिंड, गमक, खटका या संगीतातील गोष्टींचा कोण कसा वापर करतो, कोण कोणत्या गोष्टींना महत्त्व देतो, यावर प्रत्येक घराण्याची शैली आणि वेगळेपण अवलंबून असते. मेवाती घराण्याच्या गायकीमध्ये मिंड, कणस्वर, गमक यांचा वैविध्याने वापर केला जातो. भक्तिरस हा गायकीचा पाया असला, तरी सर्व रसांचा परिपोष गायकीमध्ये पाहायला मिळतो. तिन्ही सप्तकांचा सुरेख वापर मेवाती घराण्याच्या गायकीत केला जातो. आलापामध्ये शांत, स्थिर; पण संथप्रवाही असलेली, तानांच्या वेळी आक्रमक होणारी वैविध्यपूर्ण अशी ही गायकी आहे. पूर्वीच्या काळी घराण्याचे संस्थापक ज्या संस्थानामध्ये राहायचे, त्या नावाने घराणे प्रचलित व्हायचे. यातूनच किराणा, मेवाती, पटियाला, आग्रा अशी घराणी निर्माण झाली. सर्व घराणी संगीतातील मूल्येच वापरतात. पूर्वीच्या काळी एकमेकांच्या घराण्यांची गायकी सहजासहजी उपलब्ध होत नसे; त्यामुळे गुरूकडून संक्रमित झालेली विद्या जशीच्या तशी शिष्य मांडत असे. काळ बदलला त्याप्रमाणे एकमेकांच्या घराण्यांची गाणी सहज उपलब्ध होऊ लागली. त्यामुळे घराण्यांनी एकमेकांचे चांगले प्रवाह आपलेसे केले आहेत. पूर्वीप्रमाणे घराण्यांमधील साचलेपणा दूर होऊन व्याप्ती वाढली आहे. घराणी ही आई-वडिलांच्या संस्कारांप्रमाणे असतात. मूल आई-वडिलांच्या संस्कारांबरोबरच आजूबाजूच्या वातावरणातून, प्रवाहातून प्रभावित होऊन स्वत:ला घडवत असते. त्याचप्रमाणे, गायकही स्वत:च्या घराण्याचे संस्कार स्वत:मध्ये रुजवत इतर वैविध्येही आत्मसात करीत असतो.

रसिक शास्त्रीय संगीतातून आत्मानंद घेत असतात. लय, सूर, ताल यातून आत्मिक समाधान मिळते. मात्र, संगीताचे शास्त्र जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर बौद्धिक आनंदही आत्मसात करता येतो. बौद्धिक आनंद मिळविण्यासाठी संगीताचे शास्त्र समजून घेण्याची दृष्टी विकसित व्हावी लागते. शास्त्रीय संगीत आत्मिक आणि बौद्धिक असा दोन्ही प्रकारचा आनंद देते. संगीताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आजकाल भरपूर माध्यमे उपलब्ध आहेत.
अविरत साधना संगीतासाठी आवश्यक आहे. सादरीकरण हा त्यातला एक भाग. १५-१५ वर्षे साधना केल्यानंतर सादरीकरण करण्याची क्षमता हळूहळू विकसित होते. सादरीकरणामुळे रियाझाकडे दुर्लक्ष होते, असे वाटत नाही. रियाझातून कमावलेले ज्ञान सादरीकरणातून मांडण्याची संधी कलाकारांना मिळते. जो कलावंत रियाझावरील लक्ष न हटवता सादरीकरण करेल, त्याच्या साधनेची उंची वाढत राहील. तंत्रज्ञानामुळे कलेची उपलब्धता वाढली आहे. ज्याच्यावर विचारांचे संस्कार दृढ आहेत, त्याच्यावर तंत्रज्ञानातील गदारोळाचा परिणाम होणार नाही. जो कलाकार दूरदृष्टीने विचार करून तंत्रज्ञानाचा वापर करेल, त्याला शास्त्रीय संगीताच्या प्रवासामध्ये उंची गाठता येईल.

शास्त्रीय संगीतातील घराण्यांनी एकमेकांचे चांगले प्रवाह आपलेसे केले आहेत. पूर्वीप्रमाणे घराण्यांमधील साचलेपणा दूर होऊन व्याप्ती वाढली आहे. घराणी ही आई-वडिलांच्या संस्कारांप्रमाणे असतात. गायक स्वत:च्या घराण्याचे संस्कार स्वत:मध्ये रुजवत इतर वैविध्येही आत्मसात करीत असतो. गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या नावाने मिळत असलेला ‘गानसरस्वती पुरस्कार’ हा किशोरीतार्इंचा आशीर्वादच आहे, अशी भावना मेवाती घराण्याचे प्रसिद्ध गायक पं. संजीव अभ्यंकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

Web Title: The teachings of the household like parental sentiments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे