संतांची शिकवण अंगीकारली पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:28 AM2020-12-14T04:28:12+5:302020-12-14T04:28:12+5:30
पुणे: भारत ही संतांची भूमी असून देशातील प्रत्येक भागात संतांचे अस्तित्व आढळून येते. संतांनी समाज प्रबोधनाचे कार्य करण्याबरोबरच देश ...
पुणे: भारत ही संतांची भूमी असून देशातील प्रत्येक भागात संतांचे अस्तित्व आढळून येते. संतांनी समाज प्रबोधनाचे कार्य करण्याबरोबरच देश जोडण्याचेही कार्य केले. तसेच ज्यांनी शक्ती, भक्तीचा प्रसार केला, त्या संतांची शिकवण सर्वांनी अंगीकारली पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी रविवारी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नामदेव अध्यासन आणि सरहद पुणे यांच्या वतीने संत नामदेव यांच्या ७५० व्या जयंती वर्षात देशभर राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची सुरवात कोश्यारी यांच्या हस्ते केली. यावेळी सुषमा नहार लिखित ‘गुरू ग्रंथ साहिबमधील संत नामदेव’ या ग्रंथाचे प्रकाशन कोश्यारी यांनी केले. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, शीख समाजाचे नेते संतसिंग मोखा, संत नामदेव अध्यासनाचे प्रमुख डॉ. सदानंद मोरे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, सरहदचे संजय नहार उपस्थित होते.
डॉ. करमळकर म्हणाले,देश जोडण्याचा प्रवास सव्वासातशे वषार्पूर्वी संत नामदेवांनी महाराष्ट्रातून सुरू केला. दोन संस्कृतीचा मिलाफ त्यांनी घडविला. त्यांच्या कार्याचे स्मरण विविध उपक्रमांद्वारे विद्यापीठ करणार आहे.
विद्यापीठे विद्यार्थ्यांना पदवी देणारा कारखाना नसून त्यांना घडविणारे, संवेदनशीलता रुजविणारे ठिकाण आहे,असे राजेश पांडे यांनी नमूद केले. तर नामदेवांच्या राज्यातून लोक आले तर पंजाबमध्ये त्यांच्या पायावर पाणी टाकून स्वागत केले जाते. पेरणी संत नामदेवांनी केली आणि दोन धर्म जोडले, संजय नहार यांनी यावेळी सांगितले.
आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले तर प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी आभार मानले.