महापालिका निवडणुकीसाठी संघ दक्ष

By admin | Published: January 5, 2016 02:28 AM2016-01-05T02:28:22+5:302016-01-05T02:28:22+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्ताकेंद्र मानल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे मुळशी तालुक्यातील मारुंजी येथे शिवशक्ती संगम हा विशेष कार्यक्रम झाला

Team Daksh for the municipal elections | महापालिका निवडणुकीसाठी संघ दक्ष

महापालिका निवडणुकीसाठी संघ दक्ष

Next

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्ताकेंद्र मानल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे मुळशी तालुक्यातील मारुंजी येथे शिवशक्ती संगम हा विशेष कार्यक्रम झाला. हे शिबिर २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीची नांदी असून, राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानले जाणारे पिंपरी-चिंचवड काबीज करण्यासाठी ‘संघनीती’चा वापर केल्याची चर्चा आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्थापनेपासून काँग्रेस, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. यापूर्वी हा परिसर बारामती, खेड या दोन लोकसभा मतदारसंघांत समाविष्ट होता. त्यानंतर लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना केल्यानंतर हे शहर शिरूर, मावळ आणि बारामती मतदारसंघात येत आहे. सध्या बारामतीतून राष्ट्रवादी आणि खेड आणि मावळमधून शिवसेनेच्या उमेदवारीवर खासदार निवडून आलेले आहेत. तर भोसरी, पिंपरी, चिंचवड, मुळशी आणि मावळ अशा विधानसभा मतदारसंघांतील भाग पिंपरी-चिंचवड शहरात आहे. मुळशीत काँग्रेस, मावळ आणि चिंचवडमध्ये भाजपा, पिंपरीत शिवसेना आणि भोसरीत अपक्ष असे आमदार निवडून आले आहेत. या भागात संघविचारांच्या लोकांची संख्या अधिक असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकमुखी सत्ता आहे. राष्ट्रवादीतील विद्यमान पदाधिकारी पक्षातील स्थानिक नेत्यांच्या कार्यपद्धतीमुळे नाराज आहेत. त्यामुळे अनेकजण भाजपाच्या वाटेवर आहेत.
लक्ष्य बारामतीच!
४५० एकर जागा असल्याने संघाने शिबिरासाठी मारुंजीची निवड केली, असे सांगितले जात असले, तरी हा परिसर बारामती लोकसभा मतदारसंघात आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे संघ शिबिरातून बारामतीच लक्ष असल्याचे दिसून येते.
कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य
पिंपरी-चिंचवड परिसरात पहिल्यांदाच पावणेदोन लाख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य शिबिर झाल्याने या तीनही भागांतील कार्यकर्त्यांत चैतन्य आल्याचे बोलले जात आहे. या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी पूर्वीचा आणि आत्ताचा संघ, संघविचारांविषयी असणारे गैरसमज सांगण्याबरोबरच विविधतेतून एकता हीच देशाच्या प्रगतीसाठी पूरक आहे, सामाजिक समतेसाठी सर्वांनी संघाच्या झेंड्याखाली काम करा, असे आवाहन केले. त्यामुळे शिवशक्तीच्या माध्यमातून भाजपच्या कार्यकर्त्यांची ताकद वाढविण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा शहरात आहे.
संघस्थानालगत पिंपरी-चिंचवड महापालिकेची हद्द आहे. वाकड, पुनावळे या गावांलगतचा हा परिसर आहे. या गावांचा १९९७ मध्ये महापालिकेत समावेश झाला; परंतु पुनावळे गाव ते कोयतेवस्ती, पुनावळे गाव ते भूजबळवस्ती, भूमकर चौक ते मारुंजी रस्त्यांची कामे अनेक वर्षांपासून रखडली होती. तसेच हिंजवडी-मारुंजी हा रस्ताही रखडला होता. मात्र, संघ शिबिर असल्याने महिनाभरात या रस्त्यांचे रुंदीकरण, डांबरीकरणाची किमया झाली. रस्त्यांचा खर्च कोणी केला आणि कोणाच्या आदेशानुसार झाला, हा संशोधनाचा विषय आहे. मात्र, शिबिराच्या नावाखाली या भागातील नागरिकांना जोडण्याचा विचार असल्याचे दिसून येते.(प्रतिनिधी)
> महापौरपद धोक्यात
राष्ट्रवादीच्या महापौर शकुंतला धराडे या आमदार लक्ष्मण जगताप यांच्या खंद्या समर्थक मानल्या जातात. जगताप यांनी भाजपात प्रवेश केल्याने महापौरांची गोची झाली आहे. संघ शिबिरास त्यांनी उपस्थिती लावली होती. मात्र, यामुळे वाद उद्भवू शकतो, ही चूक लक्षात आल्याने महापौरांनी कार्यक्रमस्थळावरून पळ काढला. ‘नोकरी एकाची आणि चाकरी दुसऱ्यांची’ अशी टीका होत असताना महापौरांनी शिबिरास लावलेली उपस्थिती वादाच्या भोवऱ्यात आहे.

Web Title: Team Daksh for the municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.