बारामती वैद्यकीय महाविद्यालयासाठी टीम सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 07:19 PM2019-03-09T19:19:12+5:302019-03-09T19:43:58+5:30
बारामतीमध्ये एमआयडीसी परिसरात महाविद्यालय व रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे.
पुणे : बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होण्याची चिन्ह आहेत. महाविद्यालयासाठी शासनाकडून सुमारे १०० डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. बारामतीतील तीन शासकीय रुग्णालये संलग्न करून महाविद्यालयाला मान्यता घेतली जाणार आहे. पुढील आठवड्यात ही रुग्णालये व महाविद्यालयाच्या नवीन इमारतीची मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय)च्या समितीकडून पाहणी केली जाण्याची शक्यता आहे.
बारामतीमध्ये एमआयडीसी परिसरात महाविद्यालय व रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. सुमारे ११ लाख ८४ हजार चौरस फुटाचे हे बांधकाम आहे. महाविद्यालयाच्या इमारतीचे काम पुर्ण झाले असून रुग्णालयाच्या इमारतीसाठी आणखी एक वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. महाविद्यालयामध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून एमबीबीएस अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. पहिल्या वर्षी एमबीबीएसच्या १०० जागांवर प्रवेश देण्याचे नियोजन आहे. पण रुग्णालय इमारतीचे काम अर्धवट असल्याने महाविद्यालयाला मान्यता मिळणे कठीण होते. त्यामुळे बारामतीतील सिव्हर ज्युबली उप जिल्हा रुग्णालय, शासकीय महिला रुग्णालय आणि रूई येथे ग्रामीण रुग्णालय या तीनही रुग्णालयांचा वापर महाविद्यालयासाठी केला जाणार आहे.
याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे व महाविद्यालयाचे प्रभारी संजयकुमारे तांबे यांनी एमसीआय समोर सादरीकरण करून आवश्यक कागदपत्रे सादर केली आहेत. तसेच महाविद्यालयासाठी ६० प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयासह इतर शासकीय महाविद्यालयांमधील प्राध्यापकांची बदली करण्यात आली आहे. तसेच तीनही रुग्णालयांमधील ४० डॉक्टरही घेण्यात आले आहेत. ही टीम सज्ज झाल्याने एमसीआय कडून होणाऱ्या तपासणीमध्ये अडथळे येणार नाही. पुढील आठवड्यात ही तपासणी होण्याची शक्यता असून त्यामध्ये रुग्णालयांमधील सोयी-सुविधा, तसेच महाविद्यालयाची पाहणी केली जाईल. त्यामध्ये त्रुटी आढळल्यास त्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली जाईल. त्यानंतर पुन्ही पाहणी होऊन मान्यतेबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सुत्रांनी सांगितले.
----------
पुढील आठवड्यात एमसीआयची समिती पाहणी करण्यासाठी येण्याची शक्यता आहे. रुग्णालय इमारतीचे काम अर्धवट असल्याने बारामतीतील इतर तीन रुग्णालये संलग्न करण्यात येणार आहेत. महाविद्यालयासाठी प्राध्यापकांचीही नियुक्ती झाली असून ते सर्व रुजू झाले आहेत. मे अखेरपर्यंत मान्यतेचा निर्णय होऊ शकतो.
- डॉ. संजयकुमार तांबे, प्रभारी अधिष्ठाता
बारामती शासकीय महाविद्यालय