'मनी माऊ'चा प्रताप! एका मांजरीमुळे पुण्यातील तब्बल ६० हजार घरांची बत्ती गुल, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 07:41 PM2022-03-23T19:41:58+5:302022-03-23T20:11:44+5:30
चालू वीज उपकरणावर मांजर चढल्यामुळे बिघाड...
पुणे : महापारेषणच्या भोसरी उपकेंद्रात मांजरामुळे सकाळी सहाच्या सुमारास तांत्रिक बिघाड होऊन भोसरी, आकुर्डी व परिसरातील काही भागात वीजपुरवठा खंडित झाला. दरम्यान, महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युध्दपातळीवर कामे करून वीजपुरवठा तात्काळ सुरळीत केला.
महापारेषणच्या भोसरी येथील २२० के. व्ही. अति उच्च दाब उपकेंद्रातील १०० एम.व्ही.ए. क्षमतेच्या विद्युत रोहित्रामध्ये सकाळी सहाच्या सुमारास २२ के. व्ही.च्या यार्डमधील चालू वीज उपकरणावर मांजर चढल्यामुळे बिघाड झाला होता. त्यामुळे भोसरी, आकुर्डी व परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. दरम्यान, २२० के. व्ही. उपकेंद्रातील ७५ एम.व्ही.ए. क्षमतेच्या विद्युत रोहित्रावर महापारेषणकडून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. उर्वरित वीजपुरवठा हा २२० के. व्ही. भोसरी-२ उपकेंद्रातून सुरळीत करण्यात आला.
महापारेषण कंपनीच्या २२० के. व्ही. अति उच्च दाब भोसरी-१ उपकेंद्रामध्ये सध्यस्थितीत १०० एम.व्ही.ए. क्षमतेचे एक व ७५ एम.व्ही.ए. क्षमतेचा एक असे एकूण दोन विद्युत रोहित्रे आहेत. या दोन विद्युत रोहित्राव्दारे महावितरणच्या एकूण २६ वीजवाहिन्यांना वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र, यातील १०० एम.व्ही.ए.च्या रोहित्रामध्ये सकाळी सहाच्या सुमारास २२ के. व्ही. यार्डमधील चालू वीज उपकरणावर मांजर चढल्यामुळे बिघाड झाला. परिणामी, प्रामुख्याने भोसरी एम.आय.डी.सी., भोसरी परिसर, आकुर्डी परिसरात चक्राकार पध्दतीने भारनियमन करावे लागले.
दरम्यान, महापारेषणचा बिघाड झालेला १०० एम.व्ही.ए.चा विद्युत रोहित्र सध्या पूर्णतः नादुरूस्त आहे. तो बदलण्यासाठी साधारणतः दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे महापारेषणच्या २२० के. व्ही. उपकेंद्रात सध्या सुरू असलेल्या एकमेव ७५ एम.व्ही.ए. क्षमतेच्या विद्युत रोहित्रांवरील १६ वीजवाहिन्यांसह सध्या बंद असलेल्या १० वीजवाहिन्यांना देखील पर्यायी स्वरूपात वीजपुरवठा द्यावा लागणार आहे. दरम्यान, महापारेषणकडून २२० के. व्ही. भोसरी-१ उपकेंद्रामध्ये पर्यायी दुसरे रोहित्र बसविण्याची व्यवस्था युध्दपातळीवर सुरू आहे. या कालावधीत वीजग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापारेषण व महावितरण कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.