कुसेगाव केंद्रावर मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड
By Admin | Published: February 22, 2017 01:48 AM2017-02-22T01:48:41+5:302017-02-22T01:48:41+5:30
तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ६६.३३ टक्के शांततेत मतदान झाले असल्याची माहिती
दौंड : तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ६६.३३ टक्के शांततेत मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीपती मोरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विवेक साळुंके यांनी दिली.
दरम्यान, कुसेगाव (ता. दौंड) येथे एका मतदान केंद्रावर सायंकाळी पाचच्या सुमारास मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाला होता. मात्र या ठिकाणी तातडीने मतदान यंत्र बसविण्यात आले. बहुतांशी मतदान केंद्रांवर साडेपाचला मतदान संपले होते. मात्र कुरंकुभ, कुसेगाव, गार व काही मतदान केंद्रांवर सायंकाळी साडेसातपर्यंत रांगा लागलेल्या होत्या.
सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीचा अर्धातास मतदानाचा ओघ बऱ्यापैकी होता. त्यानंतर जसजसे ऊन वाढत गेले तशीतशी मतदारांची संख्या रोडावत गेली. ११ वाजेपर्यंत १४.५ टक्के मतदान झालेले होते. त्यानंतर दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत बहुतांश मतदारकेंद्र मतदारांअभावी ओस पडले होते. सायंकाळी ४ नंतर ऊन ओसरत गेल्याने मतदारांची संख्या वाढत गेली. एकंदरीतच मतदान केंद्राबाहेर मोठ्या मोठ्या रांगा आढळून आल्याने तालुक्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी लक्षात घेता मतदारांत निरुत्साह असल्याचे जाणवले.
राहू (ता. दौंड) येथे चंद्रभागा सोनबा शिंदे या १०४ वयाच्या वयोवृद्धेने मतदानाचा हक्क बजावला. शितोळेवस्ती नं. २ येथील मतदानकेंद्राच्या जवळ पुणे-सोलापूर महामार्गावरील उड्डाणपूल आहे. तेव्हा उन्हापासून संरक्षण मिळावे, म्हणून काही कार्यकर्त्यांनी उड्डाणपूलाच्या बोगद्यात पोलिंग बूथ केला होता. सकाळी बहुतांशी केंद्रांवरील पोलिंग बूथवर कार्यकर्ते वडापाव खाण्यात मग्न असल्याची वस्तुस्थिती होती. (वार्ताहर)