तंत्रज्ञानामुळे आयुष्य समृद्ध : विवेक सावंत; पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीत राष्ट्रीय परिसंवादाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:00 PM2017-11-20T12:00:43+5:302017-11-20T12:04:30+5:30
तंत्रज्ञानाने आपल्या जीवनाच्या प्रत्येक अंगात शिरकाव केला असून, केवळ नकारात्मक बाबींकडे पाहून बोटे मोडणे उचित नाही. त्यातील सकारात्मक बाबींचा विचार व्हायला हवा,’ असे प्रतिपादन एमकेसीएलचे संचालक डॉ. विवेक सावंत यांनी केले.
पुणे : ‘आजच्या युगात तंत्रज्ञानामुळे माणसाचे आयुष्य समृद्ध होत आहे. तंत्रज्ञानाने आपल्या जीवनाच्या प्रत्येक अंगात शिरकाव केला असून, केवळ नकारात्मक बाबींकडे पाहून बोटे मोडणे उचित नाही. त्यातील सकारात्मक बाबींचा विचार व्हायला हवा,’ असे प्रतिपादन एमकेसीएलचे संचालक डॉ. विवेक सावंत यांनी केले.
ज्ञान प्रबोधिनीतर्फे आयोजित राष्ट्रीय परिसंवादाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. ‘जीवन गुणवत्ता’ या वेगळ्या विषयावरील दोन दिवसीय परिसंवादात ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ, मानसशास्त्रज्ञ मानस मंडल, आयुक्त श्रावण हर्डिकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक कुकडे, विद्या बाळ यांनी विचार मांडले. परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. मोहन आगाशे यांनी केले.
या वेळी एकतर्फी तलाकविरुद्ध दीर्घ लढाई दिलेले सय्यदभाई, भटक्या गोपाळ समाजासाठी कार्यरत असणारे नरसिंग झरे, प्रशासकीय अधिकारी शीतल तेली-उगले आणि सेरेब्रल पाल्सी विषयात दीर्घकाळ काम करणाऱ्या दीपा पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
‘वेगाने बदलणाऱ्या आजूबाजूच्या परिस्थितीत स्वत:च्या आणि इतरांच्या जीवन गुणवत्तेबाबत विचार करणे अनिवार्य झाले आहे. भारतभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी परिषदेच्या माध्यमातून आपले संशोधन निबंध वाचले. येत्या काळाची गरज म्हणून या विषयातील मूलभूत संशोधन प्रकल्प हाती घेण्याचा आमचा संकल्प आहे,’ असे प्रतिपादन मुख्य संयोजिका अनघा लवळेकर यांनी केले. सुचरिता गद्रे, सुजल वाटवे, प्रणिता जगताप यांनी या परिषदेचे संयोजक समिती सदस्य म्हणून काम पाहिले.
ज्ञान प्रबोधिनीचे संचालक गिरीश बापट म्हणाले की, ‘जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी व्यक्तीने तमोगुणाकडून सत्त्वगुणाकडे प्रवास करण्याचा संदेश भारतीय तत्त्वज्ञान सांगते. जीवनव्रती समाजातील अनेकांच्या आयुष्याला स्पर्श करून त्यांची जीवन गुणवत्ता सुधारण्यासाठी कार्यरत असतात.’
विद्या बाळ म्हणाल्या की, ‘जीवन गुणवत्ता बाहेरून मिळवता येत नाही, ती मनाच्या आतून मिळवावी लागते. स्त्रियांचा समाजातील दर्जा वाढवण्यावर भर देणे गरजेचे असून, त्याशिवाय त्यांच्या जीवन गुणवत्तेबद्दल बोलणे शक्य होणार नाही.’