तंत्रज्ञानाचा गैरवापर अधिक : मोहन आगाशे; पुणे साहित्यिक कलावंत संमेलनात रंगली मुलाखत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:17 PM2017-12-26T12:17:23+5:302017-12-26T12:20:20+5:30
१७व्या साहित्यिक कलावंत संमेलनात यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे डॉ. मोहन आगाशे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम रंगला. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिलीप बराटे, सचिव वि. दा. पिंगळे, शशिकांत देवकर उपस्थित होते.
पुणे : सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे संबोधले जाते. या डिजिटलायझेशनच्या युगात मोबाईलचा अतिवापर होत आहे. यामुळे संवाद, भाषा, संपर्क या गोष्टी कमी होताना दिसून येत आहेत. अशा वेळी समाजात तंत्रज्ञानाचा चांगला वापर होण्याचे प्रमाण कमी होऊन त्याचा गैरवापर होत आहे, अशी खंत ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी व्यक्त केली.
१७व्या साहित्यिक कलावंत संमेलनात यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे डॉ. मोहन आगाशे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम रंगला. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिलीप बराटे, सचिव वि. दा. पिंगळे, शशिकांत देवकर उपस्थित होते.
आगाशे म्हणाले, तरुण पिढीचे आयुष्य हे जलद होत चालले आहे. या तंत्रज्ञानामुळे मुले पुढे जात आहेत. त्यांनी मोबाईलचे व्याकरण शिकले पाहिजे. मोबाईलवर फोटो काढून त्याच्या आहारी जाण्यापेक्षा त्या फोटोचा वापर करून त्यापासून चित्रपट निर्माण होऊ शकतो, याचा विचार करायला पाहिजे. पूर्वी चित्रपट निर्मितीसाठी कॅमेऱ्याची गरज होती; पण आता कॅमेरा तुमच्या हातात आहे, त्याचा वापर चांगल्या गोष्टीसाठी करा. तसेच या काळात भाषेला महत्त्व देणे ही एक मोठी बाब आहे. डिजिटलमुळे साक्षरता वाढत गेली व जग दोन गोष्टींत वाटले गेले. काहींना डिजिटल भाषा कळत होती तर काही लोक यापासून वंचित राहिले. आता या युगात डिजिटल भाषा शिकणे हे खूपच महत्त्वाचे आहे. तरुण पिढी यामध्ये पुढे असून ज्येष्ठ लोक मात्र मागे आहेत. समाज सिनेमा बघायला जाताना तो कुठल्या हेतूने बघतो हे जाणून घेतले पाहिजे. सिनेमा बघताना त्याची निराळी भाषा असते ती
आपली ज्ञानेंद्रिये आत्मसात करत असतात. कलेचा हा वेगळाच अनुभव सर्वांनी घ्यावा आणि भाषा हे माध्यम समजून घ्यावे.
मुलांकडून आत्महत्या
तरुण मुलांसाठी भारतात पंधरा ते तीस वयोगटातील मुले आत्महत्या करत आहेत. आणि त्याचे सर्वांत जास्त प्रमाण भारत या देशात आहे. तर मुलांना चांगली शिकवण आणि संस्कार मिळणे गरजेचे आहे व सतत निर्माण झालेला तणाव यातूनही बाहेर काढले पाहिजे, असे मोहन आगाशे म्हणाले.